नागपूर: काँग्रेसने दगडही उभा केला तरी तो विजयी होण्याच्या काळात भाजपची धुरा खाद्यांवर घेऊन पूर्व विदर्भात हा पक्ष बहुजन समाजाच्या दारापर्यंत नेणारे प्रा. महादेव शिवणकर यांची २०१४ नंतर पक्षाच्या भरभराटीच्या काळात भाजपकडून उपेक्षाच झाली. सोमवारी प्रा. शिवणकर यांनी या जगाचा निरोप घेतला.

पाच वेळा आमदार, दोन वेळा लोकसभा सदस्य असणारा पूर्व विदर्भातील या नेत्यांच्या निधनानंतर सध्याच्या भाजपच्या नेत्यांना शोक व्यक्त करायलाही संध्याकाळ उजाडावी लागली यातच सर्वकाही आले.

प्रतिकूल स्थितीत भाजपमध्ये काम केल्यानंतर पक्षाच्या अनुकूल स्थितीत दुर्लक्ष झालेल्या नेत्यांची भाजपमधील यादी लक्षात घेतली तर ती बरीच मोठी आहे. विदर्भापुरता विचार केला तर प्रा. महादेवराव शिवणकर हे त्यापैकीच एक ठरतात. आत्ता भाजपमध्ये विदर्भाचा विचार केला तर गडकरी, फडणवीस, मुनगंटीवार या नेत्याची नावे पुढे येतात. पण अंशीच्या दशकात विदर्भ म्हंटला की ज्या नेत्यांची नावे पुढे येत त्यात प्रा. शिवणकर, पांडुरंग फुंडकर, अरुण अडसड ही नावे शीर्षस्थानी असत.

राज्य भाजपमध्ये जेंव्हा महाजन-मुंडे या जोडगळीचा दबदबा होता तेव्हा शिवणकर, फुंडकर-अडसड यांचे विदर्भाच्या भाजपमध्ये महत्वाचे स्थान होते. राज्यात पहिल्यांदा भाजप-सेना युतीची सत्ता आली तेव्हा सिंचन आणि अर्थखात्यासारखे महत्वाचे पद शिवणकरांकडे आले यावरूनच त्यांचे महत्व अधोरेखीत होते. आता गोंदिया हा ज्यांना राजकीयदृष्ट्या मालकीचा वाटतो, त्याच्या निर्मितीतच शिवणकर यांचा सिहांचा वाटा होता, पण त्यांनी कधी या जिल्ह्यावर मालकी हक्क दाखवला नाही.

‘मी’ केले,‘माझ्या’मुळे विकास झाला असा घोष करणारे अनेक नेते सध्या भाजपमध्ये आहेत, पण त्या काळात शिवणकर यांनी विदर्भाषा सिंचन अनुशेष लक्षात घेऊन पूर्व विदर्भात सिंचन प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न केले. प्रादेशिक स्तरावर सिंचन महामंडळे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा प्रचार कधी केला नाही.

२०१४ नंतर राज्यात भाजपचा सुवर्णकाळ सुरू झाला. केंद्रात, राज्यात सत्ता आली. पण त्यापूर्वीच म्हणजे २००९ मध्ये शिवणकर राजकीय विजनवासात गेले होते. त्यांचे पक्षासाठीचे योगदान, अनुभव लक्षात घेऊन त्यांना मुख्यप्रवाहात आणता आले असते. पण आत्ताच्या नेतृत्वाला कदाचित त्यांची गरज उरली नसावी म्हणूनच नागपूरमधून आयात केलेल्या नेत्यांच्या हाती भंडारा-्गोंदिया या जिल्ह्यांची धुरा सोपवण्यात आली. शिवणकरांनी या जगाचा सोमवारी निरोप घेतला. पण असे अनेक शिवणकर ज्यांनी पक्षासाठी खस्ता खालल्या ते विदर्भातील जिल्ह्या-जिल्ह्यात मिळतील. बदललेल्या भाजपला आता त्यांची गरज नाही, त्यामुळे त्यांची दखलही घेतली जात नाही.