लोकसभेत आजपासून (दि. ८) सरकार विरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या बैठकीत आज बोलत असताना अविश्वास प्रस्तावावर होणाऱ्या चर्चेची चिंता करू नका, असा सल्ला खासदारांना दिला. तसेच आपण ‘आम्ही शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू’ असेही त्यांनी सांगितले. १६ तासांच्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रस्तावावर सरकारतर्फे उत्तर देणार आहेत.
मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून करण्यात आली. २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. विरोधकांच्या गदारोळामुळे सुरुवातीचे काही दिवस कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर विरोधकांनी एकत्र येऊन सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवार, दि. ८ ऑगस्टपासून या प्रस्तावावर चर्चा सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. गुरुवार, दि. १० ऑगस्टपर्यंत ही चर्चा चालेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.
अविश्वास ठराव म्हणजे काय? मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव का टिकणार नाही?
१६ तास चालणाऱ्या या चर्चेमध्ये एकूण १५ नेते भाषण करणार आहेत. काँग्रेस नेते गौरव गोगाई चर्चेची सुरुवात करतील आणि सत्ताधारी बाकावरून बोलणारे खासदार निशिकांत दुबे हे पहिले सदस्य असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३१ जुलैपासून एनडीएमधील खासदारांच्या बैठका सुरू आहेत. रोज ४० खासदार याप्रमाणे १० ऑगस्टपर्यंत या बैठका सुरू राहणार आहेत. आज झालेल्या बैठकीत मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावर भाष्य केले. ते म्हणाले, विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीकडे हा एकमेव कार्यक्रम उरला आहे. पण, आपल्यासाठी ही एक संधी आहे. “या देशातील राजकारणातून भ्रष्टाचार आणि घराणेशाही हद्दपार करणे”, हा एनडीएचा नारा यापुढेही कायम राहील, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच विरोधकांची आघाडी परस्पर अविश्वासाने भरलेली आहे, असाही आरोप मोदी यांनी केला.
अविश्वास प्रस्तावामुळे आतापर्यंत कुणाकुणाचे सरकार पडले?
विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी अंहकारी असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आपण काल (दि. ७ ऑगस्ट) राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक (NCT) मंजूर करत असताना एनडीएची ताकद दाखवून दिली आहे. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली की, एनसीटी विधेयक मंजूर करणे ही आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी होती, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.