नाशिक – विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झालेल्या शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने नाशिक येथे घेण्यात आलेल्या निर्धार शिबिरातून ठाकरे गटाचे काही मार्ग निश्चित झाले. नेहमीचा हिंदुत्वाचा मार्ग न सोडता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुका जिंकण्यासाठी बूथस्तरापासून यंत्रणा कशी कार्यरत करावी लागेल, याचा धडा देण्यात आला. अर्थात, त्यासाठी ज्यांच्यावर ईव्हीएममुळे निवडणुका जिंकण्यात आल्याचा आरोप सतत करण्यात येत आहे, त्या भाजपचे उदाहरण देणे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भाग पडले.

नाशिकच्या निर्धार शिबिराने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना काय दिले, या प्रश्नाचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नसले तरी या शिबिरातून कार्यकर्ते अजूनही ठाकरे गटावर विश्वास ठेवून असल्याचे वारंवार दिसून आले. शिबिरासाठी निवडलेल्या सभागृहाचा आवाका खूप मोठा नसला तरी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला उत्साह नेत्यांनाही धीर देणारा ठरला. विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर पक्षाला लागलेली गळती, या पार्श्वभूमीवर शिबिरातून दिसलेले चित्र पक्षासाठी अजून बरेच काही शिल्लक आहे, हे दर्शविणारे.

शिबिरांमधील कार्यक्रमांची मांडणीही कार्यकर्त्यांचा विश्वास यापुढेही कसा टिकून राहील, हे ध्यानात ठेवून करण्यात आली होती. त्यामुळेच तर आम्ही इथेच आणि मी शिवसेनेबरोबर का ? या दोन चर्चासत्रांचे वेगळेपण होते. पक्षातील काही पदाधिकारी, नेते, माजी आमदार, माजी नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतरही ठाकरे गट आमच्यासाठी महत्वाचा का, हे या चर्चासत्रांमध्ये सहभागी लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यांना उपस्थितांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला. याशिवाय मतदानकेंद्र व्यवस्था आणि मतदार यादी, संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हद्दीत घुसखोरी, कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस, बनावट कथानक व लोकशाही असे विषयही होते. अर्थात या बौध्दिक विषयांना इतर चर्चासत्रांपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा यापूर्वीही अनेकदा मांडलेले तेच ते मुद्दे पुन्हा मांडले. यावेळी त्यांनी संपूर्ण रोख भाजपवर केंद्रित केला होता. भाजपचे हिंदुत्व कसे बेगडी आहे, हे सांगतांना त्यांनी नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू, अण्णाद्रमुक यांच्याशी भाजपने केलेल्या युतीची उदाहरणे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जणूकाही बाजूलाच सारल्यासारखे दिसले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी फारशी टीका केली नाही हे विशेष.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममुळे पराभव झाल्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करतानाच ठाकरे यांनी, निवडणूक जिंकण्यासाठी बूथस्तरापासून यंत्रणा कशी राबवावी लागते, ते भाजपचे उदाहरण देत कार्यकर्त्यांसमोर मांडले. ठाकरे गट याबाबतीत कमी पडत असल्याचेच त्यांनी मान्य केले. ही यंत्रणा प्रबळ करण्याचे आवाहन त्यांनी केले. हा एक अपवाद वगळता, ठाकरे यांनी या शिबिरातून शिवसैनिकांना नवीन काही कार्यक्रम दिला असे घडले नाही.