दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : राज्यात भाजपसोबत सत्ताकारण करण्याची कारणमीमांसा करण्यावर दिलेला भर वगळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याने फारसे काही साध्य झाले नाही. कोल्हापूर शहर, जिल्ह्याचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्यावर अवाक्षर काढले नाही. निवडणुकीच्या निमित्ताने हा दौरा असल्याचे सांगण्यात आले असताना याही बाबतीत त्यांनी कसलेही भाष्य केले नाही.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर मध्ये १३ जूनला आले होते. महिना पूर्ण होत असतानाच ते पुन्हा करवीर नगरीत डेरेदाखल झाले. मागील दौऱ्याच्या वेळी त्यांनी राज्य शासनाची कार्यक्षमता, शासकीय योजनांची महती विशद करीत असतानाच ठाकरे सेनेवर हल्ला चढवला होता. कोल्हापूरबाबत काही आश्वासने दिली होती. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होऊन अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि पाठोपाठ अर्थ खात्याची जबाबदारी येणार असल्याच्या वार्तेनेच शिवसेनेच्या शिंदे गोटातील आमदारातील अस्वस्थता पुढे आली होती. खातेवाटप झाल्यावर सत्तेतील राष्ट्रवादीचे महत्त्वही अधोरेखित होऊ लागले होते.

हेही वाचा >>> लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नामी युक्ती

अशावेळी शिंदे गटाची राजकीय ताकद दाखवणे गरजेचे वाटत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील स्थानिक कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्याची सूचना केली. अवधीही अगदी चार-पाच दिवस इतक्या कमी कालावधीचा. पावसाळी वातावरण असताना सभेचे आयोजन करणे हेच मिळत एक दिव्य होते. तरीही स्थानिक नेतृत्वाने मागील सभेच्या तोडीस तोड सभा होणार असल्याच्या नेहमीप्रमाणे वल्गना केल्या. सभेच्या वेळेचे एकूण वातावरण पाहता आधीच्या भव्य सभेच्या तुलनेने यावेळची छोटेखानी सभा अगदीच क्षीण ठरली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने सक्तीने का असेना पण हजारो लाभार्थ्यांची गर्दी जमवली होती. कालच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेला काही हजाराचाही गर्दी होऊ शकली नाही. रिकाम्या खुर्च्या सभेचे वास्तव दर्शवणाऱ्या होत्या. पाऊस, शेतीची कामे, कोल्हापूर शहरात आषाढी यात्रेचे पेठापेठांमधील उत्साही वातावरण आणि सभेच्या नियोजनाची केवळ कागदावर केलेली तयारी यामुळे सभेचे एकूण वातावरणच निरुत्साही होते.

दिलासा ना शिवसैनिक ना कोल्हापूरकरांना

निवडणुकीच्या तयारीसाठी शिंदे येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले असले तरी निवडणूक, पक्ष बांधणी, पक्ष संघटनेच्या आढावा अशा बाबींना शिंदे यांनी साधा स्पर्शही केला नाही. कोल्हापूर महापालिकेची हद्द वाढ, आयुक्त नियुक्ती, खंडपीठ पासून अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्याबाबतीतही त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. मागील सभेत सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भरघोस निधी दिल्याचा पुनरुचार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे कोल्हापूरकरांना काही गवसेल ही अपेक्षाही व्यर्थ ठरली. राज्यपाल कोट्यातून बारा आमदारांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना गळ घातली पण त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून ना शिवसैनिकांना काही गवसले ना कोल्हापूरकरांना.

हेही वाचा >>> राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला सांभाळताना भाजपची कसोटी

मुख्यमंत्र्यांचा एकूण भर राहिला तो उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यावर. मागील विधानसभा निवडणुकीनंतर युतीचे खरेखुरे समर्थक देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांना बेदखल ठरवले. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन महाविकास आघाडीची आघाडीशी सत्तासंगत करण्याची चूक केली. याच मुद्द्याला धरून शिंदे यांचे ठाकरेंवर टीकेचे वाग्बाण सोडले जात होते. बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी कधीही तडजोड करणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे सांगत असताना अजित पवार गटाबरोबर सत्ता सोयरीक करावी लागल्याची खंत चेहऱ्यावर दिसत होती. भाषणामध्येही सलग, प्रवाही मुद्दा न मांडता त्यात विस्कळीत असल्याने चैतन्य जागले नाही. मंचावरील आखणी इतकी विस्कळीत राहिली कि इकडे भाषणे सुरु आणि दुसरीकडे सत्कार, निवेदन याची घाई. सामान्य शिवसैनिक असल्याचे दाखवताना मुख्यमंत्रीपदाचा आब विरघळून गेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याने साधले तरी काय ? हा प्रश्न मात्र उरला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What if chief minister eknath shinde visit to kolhapur achieved print politics news ysh
First published on: 16-07-2023 at 13:37 IST