नागपूर : एखादी व्यक्ती, राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष नकोसा झाला असेल तर त्याला दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये एक पद्धत ठरली आहे, प्रथम पक्षाशी निगडीत संघटनांचे प्रतिनिधी संबंधिताच्या विरोधात वक्तव्य करतात, नंतर पक्षाचे पदाधिकारी त्याची री ओढतो, त्याची दखल घेतली जात नसेल तर मग पक्षाच्या प्रमुख नेत्याशी निकटवर्तीय आमदार,खासदार संबंधितांच्या विरोधात उघड भूमिका घेतो. राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी केलेली मागणी ही वरील कार्यपद्धतीचाच एक भाग मानला जातो. त्यामुळेच देशमुख यांचा बोलवता धनी कोण ? असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार धस यांनीच केल होती याकडेही लक्ष वेधले जात आहे.
कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराने करावी, हे अनाकलनीय आहे. त्यामुळे ही मागणी करणारे भाजप आमदार आशीष देशमुख यांची राजकीय कारकीर्द जाणून घेणे महत्वाचे ठरते. भाजप-काँग्रेस -भाजप असा त्रिकोणी राजकीय प्रवास करणारे डॉ. आशीष देशमुख नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. ते ज्या पक्षात जातात तेथे थेट नेतृत्वाशीच त्यांचा वाद होतो हा आजवरचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतला अनुभव. २०१४ मध्ये भाजपमध्ये असताना ते काटोल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांचा आमदार झाले. पण काहीच वर्षात त्यांचे थेट पक्ष नेतृत्वाशीच खटके उडाले होते. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सरकार विदर्भाकडे दुर्लक्ष करते असे म्हणून त्यांनी आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी भाजपला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी काॅग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथेही या पक्षाचे नेते राहुल गांधी, नाना पटोले यांच्यावर टीका केली व पुन्हा भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. देशमुखांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्वाची होती. सध्या देशमुख हे नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे.
विधान परिषद सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे टीकेचे लक्ष्य ठरले आहे. विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी यापूर्वीच केली आहे. पण कोकाटे हे ज्या पक्षाचे आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप यावर भूमिका स्पष्ट केली नाही. असे असताना थेट भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणे ही बाब महायुतीत खडा टाकण्यासारखी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिली जाते. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली तेव्हा आशीष देशमुख का गप्प होते, त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी का केली नाही, असा सवाल आता राष्ट्रवादीकडून केला जातो.
दरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्र्यांचा हा प्रकार भूषणावह नाही, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर लगेचच देशमुख यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. हा घटनाक्रम लक्षात घेता भाजपकडून कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीवर दबाव वाढवणे सुरू झाल्याचे दिसून येते. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याबाबत असेच घडले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली होती व नंतर मुंडेना राजीनामा द्यावा लागला होता. कोकाटे प्रकरणात आमदार आशीष देशमुख यांनी घेतलेला पुढाकार लक्षात घेतला तर भाजपला राष्ट्रवादी नकोशी झााली असेच सध्याचे तरी चित्र आहे.
काय म्हणाले आशीष देशमुख
जंगली रमी खेळण्याच्या मुद्यावर कृषिमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी यापूर्वीही त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहेत. परंतु,आता खूप झाले. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन गेम’च्या आहरी जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारच दिवसांपूर्वी ‘ऑनलाईन गेम’वर बंदी आणण्याबाबत भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या ‘सेलिब्रेटीं’वरही कारवाई करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द कृषिमंत्री ‘रमी’ खेळत असतील तर अजित पवार यांनी कृषिमंत्र्यांवरच बंदी घालावी, . राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना कृषिमंत्र्यांच्या ‘रमी’ खेळण्यामुळे विरोधी पक्षासह सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. अजित पवार यांची ओळख ‘ॲक्शन मॅन’ अशी आहे, त्यांनीच कोकाटेंवर कारवाई करावी, असे आमदार आशीष देशमुख म्हणाले.