Prashant Kishor Bihar Elections 2025 बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रशांत किशोर नक्की काय म्हणाले? त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला? समजून घेऊयात…
काय म्हणाले प्रशांत किशोर?
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्षाच्या व्यापक हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मी निवडणूक लढवणार नाही. पक्षाने हा निर्णय घेतला आहे. मी पक्षात जे काम करीत आलो आहे, तेच सुरू ठेवणार. पक्षाच्या व्यापक हितासाठी मी संघटनात्मक काम करीत राहीन.” ते पुढे म्हणाले, “मी जर स्वतः निवडणुकीला उभा राहिलो, तर पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यातून पक्षसंघटनेच्या कामाला फटका बसेल. त्यामुळे पक्षहितासाठी हा निर्णय घेतला आहे.”

प्रशांत किशोर यांनी म्हटले, “जर बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाचा विजय झाला, तर त्याचा राष्ट्रीय स्तरावर परिणाम होईल.” मी आजवर अनेकदा पूर्ण खात्रीने सांगत आलो आहे की, माझ्या पक्षाला एक तर १५० हून अधिक जागा किंवा १० पेक्षाही कमी जागा मिळतील. याच्या अधेमधे इतर काही होण्याची शक्यता नाही.” प्रशांत किशोर यांच्या पक्षाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत.
प्रशांत किशोर यांनी निवडणुकीतून माघार का घेतली?
- संघटनेवर लक्ष केंद्रित करणे : प्रशांत किशोर यांनी जोर देऊन सांगितले की, त्यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढविण्याऐवजी संपूर्ण बिहारमध्ये जनसुराज्य पक्ष उभारण्यावर आणि मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सामूहिक निर्णय पक्षाने घेतला. एकंदरीत विचार केल्यास, एका जागेवरून निवडणूक लढवल्याने ते केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित झाले असते किंवा एकाच मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित झाले असते. ही त्यांच्या पक्षाची पहिलीच निवडणूक आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण प्रचार व्यवस्थित सांभाळणे आणि पक्षाची वाढ व कल्याण सुनिश्चित करणे कठीण झाले असते. अल्प काळात एकच जागा जिंकण्यापेक्षा दीर्घकालीन यशासाठी मजबूत संघटनात्मक पाया घालणे जनसुराज्य पक्षासाठी अधिक महत्त्वाचे असू शकते.

- राजकीय गणित : पक्षाने प्रशांत किशोर यांना राघोपूरसारख्या प्रतिष्ठित मतदारसंघातून (तेजस्वी यादव यांचा बालेकिल्ला) किंवा त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या करगहर मतदारसंघातून उभे न करण्याचा निष्कर्ष काढला असावा. किशोर यांनी सांगितल्यानुसार, अशा जागांवरून त्यांनी निवडणूक लढवल्यास, त्यांचे पक्षाच्या प्रचारावरून लक्ष हटून, ते त्यांच्या एकट्या व्यक्तीवर अधिक केंद्रित झाले असते. त्यामुळेच पक्षाने या महत्त्वाच्या जागांसाठी इतर उमेदवारांची निवड केली आहे. उदाहरणार्थ- राघोपूरमध्ये तेजस्वी यादव यांचा सामना चंचल सिंह करणार आहेत.

प्रशांत किशोर पराभवाविषयी काय म्हणाले?
प्रशांत किशोर म्हणाले, “१५० पेक्षा कमी जागा म्हणजे जरी त्या जागा १२० किंवा १३० जरी असल्या तरी, तो माझ्यासाठी पराभव असेल.” त्यांनी स्पष्ट केले की, १५० पेक्षा कमी जागा जिंकणे म्हणजे पराभव मानला जाईल. तर, चांगले यश मिळाल्यास पक्षाला बिहारमध्ये परिवर्तन करण्याची आणि देशातील प्रमुख राज्यांमध्ये त्यांचे स्थान सुधारण्याची संधी मिळू शकते. राज्यातील त्रिशंकू निकालाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आणि सांगितले की, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. “जर आम्ही चांगले प्रदर्शन केले नाही, तर त्याचा अर्थ लोकांनी आमच्यावर पुरेसा विश्वास दाखवला नाही. मात्र, असे झाले तरीही आम्ही रस्त्यावरील आणि समाजातील आमचे राजकारण पुढे चालू ठेवू,” असे ते म्हणाले.

जनसुराज्य पक्षाची पहिली निवडणूक
२०२५ ची बिहार निवडणूक प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षासाठी पहिली निवडणूक असेल आणि तीन वर्षांच्या पायाभरणीनंतर ही त्यांची पहिली खरी कसोटी असेल. किशोर यांच्या प्रयत्नांची सुरुवात पाच हजार गावांमधून केलेल्या पदयात्रेने झाली. या पदयात्रेत त्यांनी स्थानिक लोकांशी संपर्क साधला, तळागाळातील नेत्यांना ओळखले आणि लोकांशी जोडले जाईल, असे व्यासपीठ तयार केले. किशोर स्वतः निवडणूक लढवीत नसल्याने, या दीर्घकालीन प्रयत्नांचे मतदारांच्या पाठिंब्यात आणि विश्वासात यशस्वी रूपांतर झाले आहे की नाही, हे आता पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवरून दिसून येईल.
