पुणे : राज्यातील प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतरही रोजच्या वापरातील ३० टक्के प्लास्टिकचा वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या १ कोटी प्लास्टिक पिशव्यांचा कचरा दररोज तयार होत असतो. नागरिकांनी वापरलेल्या दूध पिशव्या पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्यास प्रतिदिन ३५ टन प्लास्टिक पिशव्यांचा कचरा कमी करणे सहज शक्य आहे, असे मत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

अ‍ॅमानोरा पार्क टाऊ न, चितळे ग्रुप आणि ‘रीसायकल संस्था’तर्फे आयोजित ‘प्लास्टिक कचरामुक्त अ‍ॅमानोरा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन, अ‍ॅमानोरा पार्क टाऊ न आणि सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, रीसायकल संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, रीसायकलचे चेतन बारेगर या वेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या नायनाटाबद्दल घेतलेली भूमिका आनंददायी असून महाराष्ट्र कायमच या बाबतीत अग्रस्थानी राहील, असे कदम यांनी सांगितले.

श्रीवास्तव म्हणाले,की प्लास्टिक कचऱ्यामध्ये गेल्यास त्यातील पुनर्निर्मितीची संधी वाया जाते. कचऱ्यातील प्लास्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे प्लॅस्टिकचा संचय आणि पुनर्निर्मिती गरजेची आहे.

श्रीपाद चितळे म्हणाले,‘ ग्राहकांनी धुतलेली दूध पिशवी परत केल्यास अर्ध्या लिटरच्या पिशवीमागे २५ पैसे आणि १ लिटरच्या पिशवीमागे ५० पैसे ‘चितळे दूध’तर्फे परत दिले जाणार आहेत.’