नववीच्या विद्यार्थ्यांची आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये राज्यातील ६५ टक्के विद्यार्थी गणितामध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील नववीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली होती.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत नववीच्या विद्यार्थ्यांची मराठी, इंग्लिश आणि गणित या विषयांची प्रत्येकी पन्नास गुणांची चाचणी घेतली. आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही चाचणी होती. जिल्हा परिषदेच्या, महानगर पलिकेच्या, नगर परिषदेच्या माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. राज्यातील १४५२ शाळांमधील साधारण ७५ हजार विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये गणित विषयामध्ये ६३ टक्के विद्यार्थ्यांना सोळा पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. मराठीमध्ये ३० टक्के तर इंग्लिशमध्ये ३३ टक्के विद्यार्थ्यांना सोळा पेक्षा कमी गुण मिळाले आहेत.
राज्यात आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांची नेमकी गुणवत्ता समोर येत नाही. या पाश्र्वभूमीवर राज्यात ही योजना राबवण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना या चाचणीमध्ये ३५ टक्क्य़ांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत, त्यांच्यासाठी एससीईआरटी नवे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकामध्ये नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पाया तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. उपक्रमाच्या माध्यमातून विषय पक्का करण्यासाठी ही पुस्तके उपयोगी ठरणार आहेत. ही पुस्तके शाळांमार्फत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ३५ टक्क्य़ांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती एससीईआरटीमधील अधिकाऱ्यांनी दिली.