News Flash

ग्रामीण आरोग्यसेवेच्या विस्ताराचे उद्दिष्ट

सिंहगड पायथ्याच्या परिसरात डोणजे येथे ‘आपलं घर’तर्फे सुसज्ज रुग्णालय आणि दवाखाना चालवला जातो.

पुण्यातील ‘आपलं घर’ संस्थेचा निराधारांना आधार

ज्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नाही अशा निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील ‘आपलं घर’ संस्थेला निराधारांसाठी काम करत असतानाच ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची दुरवस्था लक्षात आली असून ती दूर करण्यासाठीही संस्थेने काम सुरू केले आहे. सरकारकडून कोणतीही मदत न घेता आजवर हजारो रुग्णांवर विनामूल्य उपचार करणाऱ्या या संस्थेला ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा आणखी विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी देणगीच्या रूपाने संस्थेला मदत करण्याची आवश्यकता आहे.

निराधारांचं ‘आपलं घर’

सिंहगड पायथ्याच्या परिसरात डोणजे येथे ‘आपलं घर’तर्फे सुसज्ज रुग्णालय आणि दवाखाना चालवला जातो. तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व प्रकारचे उपचार अत्याधुनिक पद्धतीने करणारी यंत्रणा या रुग्णालयात आहे. शस्त्रक्रिया कक्ष, प्रसूतिकक्ष व इनक्युबेटर, डिजिटल क्ष किरण चिकित्सा, ईसीजी, नेत्र व दंत चिकित्सा आदी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज आहे. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्यांकडून तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य आदी कोणत्याही कारणासाठी एकही रुपया घेतला जात नाही. सिंहगड आणि मुळशी तालुक्यात दुर्गम भागात अनेक गावे अशी आहेत की, जेथे रस्ते नाहीत, वीज नाही आणि आरोग्यसेवाही नाही. अशा दुर्गम भागातील रुग्ण डोणजे येथील रुग्णालयापर्यंत येऊ शकत नाहीत, ही परिस्थिती ओळखून ‘आपलं घर’तर्फे फिरता दवाखानाही सुरू करण्यात आला आहे. रोज किमान शंभर रुग्णांना या दवाखान्यामुळे तपासण्या आणि औषधोपचारांचा नि:शुल्क लाभ होतो. सोमवार ते रविवार कोणत्या दिवशी दवाखाना कोणत्या गावांना जाणार याचे वेळापत्रक ठरलेले आहे. त्यानुसार सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असा हा दवाखाना रोज प्रवास करत असतो. या फिरत्या दवाखान्यात ईसीजीसह सौरऊर्जेवर चालणारी सर्व उपकरणे आहेत. दुर्गम भागातील नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या या रुग्णसेवेचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट संस्थेने समोर ठेवले आहे. ग्रामीण भागाची ही आजची खरी गरज आहे. सध्याच्या  प्रकल्पाचा विस्तार करून नवी गावे जोडण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी संस्थेला अर्थसाहाय्याचीही गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:16 am

Web Title: aapla ghar organization at sarva karyeshu sarvada
Next Stories
1 मांजरआख्यान!
2 आयटी कंपन्यांवर खैरात; करदाते मात्र वाऱ्यावर
3 बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड काढणारे अटकेत
Just Now!
X