कला-क्रीडा नैपुण्याच्या गुणांचे यंदा २ लाख २ हजार ९१७ लाभार्थी

पुणे : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांवर कला-क्रीडा नैपुण्यासाठीच्या अतिरिक्त गुणांची खैरात करण्यात आली आहे. यंदा २ लाख २ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी सवलतीच्या गुणांचा लाभ घेतला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या गुणांचे लाभार्थी काही हजारांनी वाढल्याचे समोर आले आहे. त्यातही चित्रकला आणि लोककलेसाठीचे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

विविध कला व क्रीडा नैपुण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ३ ते २५ दरम्यान अतिरिक्त गुण दिले जातात. गेल्या वर्षभरात करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात अपवादानेच कला-क्रीडा स्पर्धा झालेल्या असताना या विद्यार्थ्यांना हे गुण देण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या निकालातही कला क्रीडा नैपुण्याचे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरघोस वाढली होती.

राज्य मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार यंदा एकू ण २ लाख २ हजार ९१७ विद्यार्थ्यांना कला क्रीडा नैपुण्यासाठीचे अतिरिक्त गुण देण्यात आले. त्यात सर्वाधिक १ लाख ६५ हजार ७३ विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठीचे गुण मिळाले. त्या खालोखाल १५,७९३ विद्यार्थ्यांनी क्रीडा, १५,७६५ विद्यार्थ्यांनी लोककलांसाठीचे अतिरिक्त गुण प्राप्त के ले. तर २,२१२ विद्यार्थ्यांना शास्त्रीय गायन, १,८७५ विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य, १,३५४ विद्यार्थ्यांना वाद्य वादनासाठी, ८०१ विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडसाठी व एका विद्याथ्र्याला एनसीसीसाठी गुण मिळाले आहेत. गेल्यावर्षीच्या आकडेवारीशी तुलना केल्यास चित्रकला आणि लोककलेसाठीचे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा लक्षणीय वाढली आहे. गेल्यावर्षी चित्रकलेसाठी १ लाख ४४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी चित्रकलेसाठी आणि लोककलेसाठी ४ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी गुण मिळवले होते. तर यंदा १ लाख ६५ हजार ७३ विद्यार्थ्यांनी चित्रकलेसाठी आणि १५ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी लोककलेसाठीचे गुण मिळवले असल्याचे दिसून येते.

शंभर टक्के निकालाच्या शाळांमध्ये भरघोस वाढ

यंदा राज्यातील २२ हजार ३८४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर नऊ शाळांचा निकाल शून्य ते दहा टक्के निकाल लागलेल्या नऊ शाळा आहेत. तर गेल्यावर्षी ८ हजार ३६० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा १४ हजार २४ ने वाढल्या आहेत. मुंबई विभागातील सर्वाधिक ३ हजार ७०६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शून्य ते दहा टक्के निकालाच्या सर्वाधिक चार शाळा नागपूर विभागातील आहेत.

गुण मिळवलेले विभागनिहाय विद्यार्थी

’ पुणे – ४५ हजार ७६२

’ नागपूर – ५ हजार २९८

औरंगाबाद – १३ हजार ७७३

’ मुंबई – ३६ हजार १५९

कोल्हापूर – ४२ हजार १८४

अमरावती – १४ हजार १३

’ नाशिक – २५ हजार ८७४

’ लातूर – ९ हजार २२४

’ कोकण – ९ हजार ९३०