अजित पवारांनी आरोप फेटाळले

पुणे : सातारा जिल्ह्य़ातील जरंडेश्वर साखर कारखाना विक्री प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. हा कारखाना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विकण्यात आला आहे. विक्री करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून यामध्ये गैरव्यवहार काय, हे आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करावे, असे प्रतिआव्हानही पवार यांनी या वेळी दिले.

जरंडेश्वर साखर कारखाना विक्री प्रकरणात एखाद्या यंत्रणेला चौकशी करण्याचा अधिकार आहे. याबाबत मागेही अनेक तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि माजी न्यायाधीश यांनी केलेल्या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. तर आर्थिक गुन्हे विभागाची (ईओडब्ल्यू) चौकशी अंतिम टप्प्यात आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हा कारखाना विकत घेतलेल्या गुरू कमॉडिटीची कशाच्या संदर्भात चौकशी करत आहे, याची माहिती नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘‘२००७ मध्ये जनहित याचिके वर निर्णय देताना उच्च न्यायालयाने कारखाना विक्रीचे आदेश दिले. त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून ‘जरंडेश्वर’ची विक्री करण्यात आली. हा संचालक मंडळाचा निर्णय नव्हता. १२-१५ कंपन्यांनी भरलेल्या निविदेत सर्वाधिक ६५.७५ कोटी रुपयांना ‘गुरू कमॉडिटी’ने कारखाना खरेदी केला. या कं पनीकडून हा कारखाना बीव्हीजी समूहाचे हणमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर मिल या कंपनीतर्फे  ३५ वर्षांसाठी चालवायला घेतला. मात्र गायकवाड यांना पहिल्याच वर्षी तोटा झाल्याने माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी हा कारखाना चालवायला घेतला. कारखान्याची विस्तारवाढ करण्यासाठी २०१६-१७ मध्ये पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्हा बँकांकडून परवानग्या घेऊन ३००-४०० कोटींचे कर्ज घेतले आहे. सध्या हा कारखाना व्यवस्थित चालू असून कर्जफेडही वेळेत करण्यात येत आहे.’’

दरम्यान, ‘ईडी’कडून ‘गुरू कमॉडिटी’ची चौकशी सुरू आहे. जरंडेश्वर कारखाना ‘गुरू कमॉडिटी’च्या नावे असल्याने ‘ईडी’ने त्यावर टाच आणली आहे. ‘‘यापूर्वीही तक्रारी झाल्यानंतर विविध यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीही निष्पन्न झालेले नाही. यामध्ये घोटाळा काय हे आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करावे. ईडीच्या कारवाईला कारखान्याचे संचालक मंडळ न्यायालयात आव्हान देणार आहे,’’ असेही पवार म्हणाले.

जनता सर्व जाणते

देशात सध्या एकंदरीत काय राजकारण सुरू आहे, हे सर्व जण पाहत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून पुढील वर्षी ७५ वर्षे होत आहेत. एवढय़ा वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकारिणीत कोणाची चौकशी करण्याचा ठराव मांडला गेला आहे का, असा सवाल करत चौकशीमागचे गौडबंगाल न ओळखण्याएवढे नागरिक दुधखुळे नाहीत, असा टोला पवार यांनी लगावला.

सर्वच आजारी साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीची चौकशी करून ‘ईडी’द्वारे कारवाई करावी. राज्यातील ४३ सहकारी कारखान्यांच्या खरेदी-विक्रीमध्ये गैरव्यवहार झाला असल्याबद्दल आम्हीच मागणी लावून धरली आहे.

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सहकारी साखर कारखान्यांच्या घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव घेतले होते, मात्र फकीर माणसाचे कोण ऐकतो? ईडीच्या चौकशीत ४८ कारखान्यांमधील घोटाळा लोकांसमोर येईल.

अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

सत्तेच्या बळावर काहीही करू शकतो, असे अजित पवार यांना वाटले असावे. पण त्यांना आता या कारवाईमुळे जरब बसेल. या देशातील न्यायव्यवस्थेला रामशास्त्री प्रभुणेंची परंपरा आहे. या लोकांना आज ना उद्या तुरुंगात जावे लागेल.

डॉ. शालिनीताई पाटील, कारखान्याच्या संस्थापक-अध्यक्ष

अजित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने दिलेली नोटीस ही राष्ट्रवादी पुरस्कृत भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे एक टोक आहे. ४७ कारखाने गेल्या १० वर्षांत विकले गेले. त्यांच्या खरेदी-विक्रीत झालेले घोटाळे फक्त आर्थिक नाहीत तर जमिनींचाही एक मोठा घोटाळा आहे.

– माणिकराव जाधव, याचिकाकर्ते