बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षकि निवडणुकीत सत्ताधारी अजित पवार गटाने पुन्हा बाजी मारली  सर्व २१ जागांवर अजित पवार पॅनेलच्या उमेदवारांनी निर्वविाद विजय मिळविला. जवळच्याच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार गटाचा पराभव झाल्याच्या पाश्र्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. माळेगाव साखर कारखान्याच्या निकालानंतर अजित पवार यांनी जातीने लक्ष देऊन गावे, वाडय़ावस्त्यांवर प्रचार सभा घेतल्या. अधिवेशन काळातही त्यांनी तालुक्यात लक्ष केंद्रित केले होते. तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण आपण होऊ देणार नाही, असा मुद्दा ते सातत्याने मांडत होते.विरोधकांनी एकत्र येऊन पवारांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला. त्यात सतीश काकडे, महादेव जानकर, राजू शेट्टी, विजय शिवतारे, माळेगाव कारखान्याचे चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा समावेश होता.