पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार व स्थानिक प्रशासनाकडून सर्वोतपरू प्रयत्न सुरू आहेत. मात्र, येथील नागरी जीवन सुरळीत करणे देखील अत्यावश्यक असल्याने, प्रशासनाकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.

”या अगोदरच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बिगर अत्यावश्यक वस्तुंची दुकाने पी- १, पी -२ पद्धतीने खुली राहण्याबाबत नमूद होते. ती अट आता रद्द करण्यात येत असून त्या ऐवजी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व रस्त्यांवरील सर्व बिगर अत्यावश्यक दुकानं आता पूर्वी निश्चित केलेल्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ७ खुली राहतील. असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकद्वारे कळवले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २२ दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा दर हा तीन टक्के एवढा आहे, तर प्रति दहा लाख लोकसंख्येमागे दैनंदिन चाचण्यांमध्ये गेल्या सव्वा महिन्यापासून पुणे देशात अग्रणी आहे. येत्या तीन ते चार आठवडय़ांमध्ये पुण्यातील करोना रुग्णांचा आलेख खालावण्याची शक्यताही प्रशासनाकडून सोमवारी व्यक्त करण्यात आली आहे.