जखमी वासरु पिंपरी महानगरपालिकेच्या दारावर सोडून बजरंग दलाने आंदोलन केलं. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरं, गायी, गुरांचा प्रश्न मांडण्यात आला. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्याचमुळे निषेध नोंदवत हे आंदोलन करण्यात आलं असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. एका मोटारीच्या डिक्कीमधून हे वासरु आणले गेले त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर या वासराला बसवून बजरंग दलाने आंदोलन केले. वासराच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली होती मात्र ते घाबरले होते.

सविस्तर माहिती अशी की डुकरांच्या लसीकरणासाठी त्यांना पकडण्यासाठी महानगर पालिका ही शेकडो रुपये मोजत आहे. भटके कुत्रे आणि डुकरांवर मोठ्या प्रमाणावर निधी महानगर पालिका उपलब्ध करून देत आहे. मात्र, गोमातेच्या संरक्षणासाठी निधी उपलब्ध होत नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोरक्षणाबाबचा प्रश्न हाणून पाडला आहे. याच गोष्टीचा निषेध म्हणून आज अपघातग्रस्त झालेल्या वासराला महानगर पालिकेच्या प्रवेश द्वारावर आणण्यात आले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता त्यामुळे जखमी वासरू भेदरलेले होते. यावेळी सुरक्षा रक्षक आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा या पेक्षा तीव्र आंदोलन करून जनावरे महानगर पालिकेच्या दारात आणू असा इशाराही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला.