करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारल्या जाणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या निधीवरून राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शहरात बॅनरबाजी देखील करण्यात आल्याचे दिसत आहे.

या मुद्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गुडलक चौकात एक बॅनर लावण्यात आले आहे. ”ज्या पुणेकरांच्या जिवावर सत्ता मिळवली, त्यांचाच जीव घ्यायला निघालात? हॉस्पिटल बांधायला पैसे देणार नाही म्हणता? सत्तेचा इतका माज बरा नव्हे! ही मस्ती जिरवली जाईल, घोडा मैदान जवळच आहे.” असा या बॅनरवर मजकूर लिहिलेला असून, त्या खाली ”आपला – तुम्हाला मतदान करून वैतागलेला पुणेकर” असं लिहिलेलं आहे. या बॅनरची शहरभर चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले ”जवळजवळ ७५ कोटी रुपायांची महापालिकेला तरतूद करावी लागणार आहे. आपण विनंती एवढीच केली होती की, शासानाने जास्तीत जास्त निधी द्यावा, शासनाने जर आपल्याला सांगितले की, महापालिकेने २५ टक्के निधी द्यावा तर आपण २५ टक्के नक्की देऊ.  सध्या यावरून जे राजकारण करत आहेत त्यांना याबाबत विचारा, माझी कालही भूमिका स्पष्ट होती व आज देखील स्पष्टच आहे. या पुढील काळात एक मोठं हॉस्पिटल कायमस्वरूपी जे गरीब रुग्णांना नक्की व्यवस्था देईल, असं निर्माण करण्याचा प्रयत्न या सहा महिन्यात मी नक्की आहे. त्यावेळी कोण कोण राजकारण करत  व कोण थांबवत हे तुम्ही पहा.”

शहारात उभारल्या जाणाऱ्या जम्बो हॉस्पिटलचा २५ टक्के खर्च महापालिकेने उचलावा, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. विशेष म्हणजे यास महापौरांनी देखील मान्यता दिलेली आहे.

तीन जम्बो आयसोलेशन सेंटर्स उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी साधारण ३०० कोटींचा निधी लागणार आहे. यासाठीची ५० टक्के रक्कम राज्य सरकार, २५ टक्के रक्कम पुणे महापालिका, १२.२५ टक्के पिंपरी-चिंचवड व साडेबारा टक्के निधी पीएमआरडीएने द्यावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत महपौरांकडून या निधीबाबात नकार देण्यात आला नव्हता, परंतु महापालिकेस सहाकार्य करा असे सांगण्यात आले होते. शिवाय, या आयसोलेशन सेंटर्ससाठी सर्वोतोपरी मदत करण्याची तयारी देखील दर्शवली होती.