भामा आसखेड धरणातून पुणे शहराला पाणी आणण्याची योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवावी आणि प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेही ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी आणण्याची योजना महापालिकेने हाती घेतली असून, केंद्र व राज्य शासनाने ही योजना मंजूर केली आहे. या योजनेमधील जलवाहिनीचे काम पालिकेने सुरू केले होते. मात्र भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि अन्य मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्या, अशी मागणी करत स्थानिक शेतकऱ्यांनी जलवाहिनीचे काम आंदोलन करून थांबवले आहे.
या आंदोलनामुळे महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. भामा आसखेड पाणीपुरवठा योजना हा पुणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे वडगावशेरी, खराडी, चंदननगर, येरवडा, कळस, धानोरी आणि लोहगाव हद्दीपर्यंतच्या भागात मोठय़ा संख्येने असलेल्या लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडण्यासाठी ठोस निर्णय होणे आवश्यक आहे. महसूल, पाटबंधारे, पुनर्वसन या विभागांचे अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बठक आयोजित करावी. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करणे शक्य होईल, असेही महापौरांनी या पत्रात नमूद केले आहे.