पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यामुळे अनेक नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. गेल्यावर्षी याच पिंपरी-चिंचवड शहरात आणि देशभरात बँक, एटीएमवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे व्यावसायिकांना देखील याचा चांगलाच फटका बसला. त्यावेळी व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहारांसाठी स्वॅप मशीन आणि पेटीएमसारखे पर्याय वापरायला सुरूवात केली.

नोटाबंदीमुळे मंदी हा निव्वळ कांगावा – चंद्रकांत पाटील

अशाच एका चहावाल्याची कहाणी आता समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड मधील सांगवी येथील लक्ष्मण काची गेल्या नऊ वर्षांपासून चहाची टपरी चालवतात. या काळात व्यवसायात त्यांचे चांगले बस्तान बसले होते. मात्र, नोटाबंदीनंतर पैशांची चणचण जाणवू लागल्यानंतर त्यांचा व्यवसाय संकटात सापडला होता. त्यामुळे काची यांना कॅशलेस पर्यायांकडे वळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तेव्हा काची यांनी ग्राहकांकडून पेटीएमच्या माध्यमातून पैसे स्विकारायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची गाडी रूळावर आली. बहुतांश ग्राहकांनी पेटीएम वापरल्याने व्यवहार सुरळीत झाले. काही महिन्यांनी चलनाचा तुटवडा कमी झाल्यानंतर पेटीएमवरून होणारे व्यवहारही मंदावले. सध्या केवळ पाच टक्केच व्यवहार पेटीएमवरून होत असल्याचे काची यांनी सांगितले. बाजारपेठेतील हे प्रातिनिधिक उदाहरण पाहता नोटाबंदीमागील कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा हेतू कितपत साध्य होणार, याबाबत साशंकतेचे वातावरण आहे.

नोटाबंदीमुळे वेश्या व्यवसायाला चाप- रवीशंकर प्रसाद