महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे पाचशे लोकांचा बळी घेणाऱ्या विजांवर काही प्रमाणात विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. त्यासाठी विजांच्या निर्मितीचा वेध घेणारे सेन्सर्स व आवश्यक संगणकप्रणाली अशी यंत्रणा उभारण्यात आली असून, त्याद्वारे विजा नेमक्या कोणत्या भागात कोसळण्याची शक्यता आहे, याचा अंदाज अर्धा ते दोन तास आधी देणे शक्य होणार आहे. ही यंत्रणा नुकतीच कार्यान्वित झाली आहे. हे अंदाज येत्या उन्हाळ्यापासून लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.
पुण्यात असलेल्या भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) या संस्थेने ही यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरसह एकूण २० ठिकाणी सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. त्याचा नियंत्रण कक्ष पुण्यात आयआयटीएम येथे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या विजांबाबत अचूकपणे अंदाज मिळू शकणार आहे. या यंत्रणेचा फायदा महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनाही होणार आहे. विजांच्या अंदाजांबरोबरच त्यांची निर्मिती, त्या कोसळण्याचे मुख्य क्षेत्र, त्याची कारणे यांचा अभ्यासही करता येणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख व आयआयटीएम येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी दिली. त्यांच्यासोबत व्ही. गोपालकृष्णन व पी. मुरुगवेल हेही या प्रकल्पात सहभागी आहेत. आताच्या टप्प्यासाठी या प्रकल्पाला १० कोटी रुपये खर्च आला आहे.
आयआयटीएमतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात वीज कोसळण्यामुळे दरवर्षी सुमारे ५०० लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी २०० ते २५० मृत्यू एकटय़ा मराठवाडय़ात होतात. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विजांचा अंदाज देणारी यंत्रणा विकसित करण्याचा केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाची योजना होती. यासंदर्भात आयआयटीएम येथे डॉ. पवार यांच्या पथकाकडून अभ्यास सुरू होता. त्यांनी ही यंत्रणा उभारण्याची जबाबदारी पेलली. त्यासाठी अमेरिका अर्थ नेटवर्क या कंपनीचे विशिष्ट सेन्सर्स मागवण्यात आले आहेत. या सेन्सर्समुळे ढगांची निर्मिती, त्यात तयार होणारा विद्युत भार व त्यांचे सरकणे या गोष्टी नेमकेपणाने टिपणे शक्य होणार आहे. एक सेन्सर सुमारे २०० ते २५० किलोमीटर अंतरापर्यंतचे बदल नेमकेपणाने टिपू शकतो. २० सेन्सर्समुळे संपूर्ण महाराष्ट्र व आसपासचा प्रदेशातील कोणत्या गावात विजा कोसळण्याचा धोका आहे, याचा अंदाज देणे शक्य होणार आहे.

‘अंदाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान’
‘‘या यंत्रणेमुळे विजांचा कोसळण्याचा नेमका अंदाज जिल्हा मुख्यालये व महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शित केले जातील. आता आव्हान आहे ते हा अंदाज थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे! जे लोक संकेतस्थळावर आपले मोबाइल क्रमांक व गावाचे नाव नोंद करतील. त्यांना त्यांच्या त्यांच्या गावासाठी एसएमएसद्वारे अंदाज पाठवले जातील. मात्र, इच्छुक लोकांची संख्या काही लाखांत असू शकते. विजांची स्थिती असताना त्यांना दर पाच-दहा मिनिटांनी एसएमएस पाठवणे हे खर्चिक काम असेल. त्यासाठी राज्य सरकार व भूविज्ञान मंत्रालयाची चर्चा सुरू आहे. यातून येत्या उन्हाळ्यापर्यंत काहीतरी मार्ग निघेल.’’
– डॉ. सुनील पवार, प्रकल्प प्रमुख

सेन्सर बसवलेली २० ठिकाणे-
मध्य महाराष्ट्र : पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, नंदूरबार
कोकण : मुंबई, हरिहरेश्वर, रत्नागिरी, वेंगुर्ले
मराठवाडा : औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी
विदर्भ : नागपूर, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर