देशातील पहिला ज्ञान समूह ठरण्याचा मान
पुणे : विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षण संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्राला एकत्र आणून पुणे ज्ञान समूहाची (पुणे नॉलेज क्लस्टर) स्थापना करण्यात आली आहे. के ंद्राची अंतिम मान्यता मिळालेला पुणे ज्ञान समूह देशात पहिला असून, पर्यावरण, आरोग्य, इलेक्ट्रिक वाहने, बिग डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांसाठी हा ज्ञान समूह काम करणार आहे. या ज्ञान समूहाच्या समन्वयाची जबाबदारी (नोडल एजन्सी) आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राकडे (आयुका) देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक कार्यालयाकडून या ज्ञान समूहाच्या स्थापनेला नुकतीच औपचारिक मान्यता देण्यात आली. तसेच या ज्ञान समूहाला केंद्राकडून निधीही दिला जाणार आहे. आयुकाचे माजी संचालक आणि ज्ञान समूहाचे प्रधान संचालक डॉ. अजित केंभावी, सहप्रधान संचालक आणि अशोका विद्यापीठाचे प्रा. एल. एस. शशिधरा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयुकाचे संचालक डॉ. सोमक रायचौधुरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पर्सिस्टंट सिस्टिम्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष प्रदीप भार्गवा, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने, व्हेंचर सेंटरचे संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ या वेळी उपस्थित होते.
डॉ. केंभावी म्हणाले, की पुणे आणि परिसरातील शिक्षण, संशोधन आणि औद्योगिक संस्थांना ज्ञान समूहात सहभागी होता येईल. शहराच्या समस्या शोधणे, विद्यार्थी, युवा संशोधक, नवउद्यमी आणि उद्योजकांना संधी मिळण्यासाठी सहकार्य, ज्ञान आणि कौशल्यवृद्धीसाठी विविध उपक्रम, ज्ञानाधारित उद्योगांमधील रोजगारक्षमता वाढवणे ही या ज्ञान समूहाची उद्दिष्टे आहेत. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी, आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे महापालिका, पुणे स्मार्ट सिटी व राज्य सरकारच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले जातील.
उद्योग क्षेत्राकडून सहकार्य
शिक्षण, उद्योग आणि संशोधन या तीनही क्षेत्रांत आघाडीवर असल्याने पुण्याला ज्ञान समूहाची संधी मिळाली. हा ज्ञान समूह दिशादर्शक ठरेल, असे भार्गवा म्हणाले. पुण्यातील उद्योगजगतातर्फे क्लस्टरला पूर्ण सहकार्य केले जाईल. शिक्षण, उद्योग आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांच्या समन्वयाचा पुण्याला फायदा होईल, असे मत डॉ. देशपांडे यांनी मांडले. अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या ज्ञान समूहांनी त्या देशाच्या विकासाला हातभार लावला आहे. ती संधी पुणे ज्ञान समूहाला प्राप्त झाली आहे, असे गिरबने यांनी सांगितले.
केंद्राकडे प्रस्ताव सादर
राज्यातील साथरोगांसंदर्भातील माहितीसाठा, करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी, आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय कॅन्सर जनुकीय आराखडा अशा काही प्रकल्पांचा प्रस्ताव मान्यता आणि निधी मिळण्यासाठी पुणे ज्ञान समूहातर्फे केंद्र शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती डॉ. रायचौधुरी यांनी दिली.