आधार कार्ड नोंदणीसाठी १ मार्चपासून प्रत्येक प्रभागात दोन केंद्र सुरू केली जातील, ही महापालिकेची घोषणा पुन्हा एकदा घोषणाच ठरली असून अशाप्रकारे प्रत्येक प्रभागात येत्या आठ-दहा दिवसांत नोंदणी सुरू केली जाईल, असे आता सांगण्यात येत आहे.
एकीकडे आधार कार्डसाठी अनेक ठिकाणी सक्ती केली जात असतानाच महापालिकेची कार्ड नोंदणीची प्रक्रियाच दोषपूर्ण आहे. प्रत्येक प्रभागात १ मार्चपासून दोन केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापही अशी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना नक्की माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न हेमंत रासने यांनी स्थायी समितीत उपस्थित केला होता.
शहरात अद्यापही सुमारे २० लाख नागरिकांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्याचे काम बाकी असले, तरी दुसरीकडे अनेक ठिकाणी या कार्डसाठी सक्ती देखील केली जात आहे. वास्तविक, ८० टक्के नोंदणीचे काम पूर्ण झाल्यानंतरच अशाप्रकारची सक्ती करण्याबाबत केंद्राने निर्देश दिले असले, तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या सर्व विषयाची माहिती योग्य त्या प्रकारे नागरिकांना होईल यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी रासने यांनी या वेळी केली.  
त्यावर निवेदन करताना उपायुक्त मंगेश जोशी यांनी येत्या आठ-दहा दिवसांत आधार कार्ड नोंदणीची केंद्र वाढविण्याचेनियोजन केले जाईल, असे सांगितले. प्रत्येक प्रभागाला दोन नोंदणी यंत्र उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून शहरातील सर्व ७६ प्रभागांत लवकरच दोन-दोन केंद्र सुरू होतील, अशीही माहिती जोशी यांनी या वेळी दिली.