पुणे शहराचं नाव बदलण्याची आज तरी आवश्यकता नाही. नावं बदलून काहीच साध्य होत नाही. नावं बदलल्याने शहरांच्या विकासात फरक पडत नाही, त्यामुळे नामांतराच्या मागे फार कोणी लागू नये. मात्र, औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरणं करणं ही अस्मितेची बाब आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका मांडली. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरेकर म्हणाले, “औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी, धरसोड करणारी आहे. काँग्रेस नेते शिवसेनेच्या भूमिकेला विरोध करत आहेत. शिवसेनेला अस्मिता हवी का सरकार हवं हे ठरवावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, नेते संजय निरुपम, मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेने स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर करावी,”

आणखी वाचा- ‘तो’ प्रस्ताव दिल्लीत का रखडला हे भाजपाने जनतेला सांगावं; संजय राऊतांचा थेट सवाल

आम्ही हा विषय बसून सोडवू असं शिवसेनेचे खासादर संजय राऊत म्हणतात आणि त्याचवेळी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे विरोध केल्यास जशाच तसे उत्तर देऊ अशी भूमिका मांडत आहेत. तसेच मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असल्याचे महाविकास आघाडीमधील नेते मंडळी म्हणत असल्याने या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे, असेही दरेकर यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा”; उद्धव ठाकरेंना आमदाराने सूचवलं नाव

खडसे सीडी शोधत असावेत : प्रविण दरेकर

ईडी ही संस्था स्वायत्त असून ईडीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा मागील काही दिवसांपासून केली जात आहे. हे योग्य नसून व्यवस्थेला आव्हान देण्याची भाषा केली जात असून याद्वारे समाजात अराजकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीसाठी हे घातक असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दरम्यान, ईडीची चौकशी झाली की, सीडी लावतो, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. पण आता कदाचित ते सीडी शोधत आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला.