बी. एन. सॉफ्टवेअर कंपनीत काम करण्यासाठी संगणक अभियंत्यांकडून पन्नास हजार रुपये अनामत रक्कम घेऊन त्यानंतर दोन महिन्याचा पगार न देता ८४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत नवीन १०३ संगणक अभियंत्यांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगणक अभियंता गणेश क्षीरसागर (वय २४, रा. सोलापूर) याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून निरजकुमार झा, भावना दीक्षित आणि लोकसागर कुमार प्रिया (रा. मोशी प्राधिकरण, पुणे) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आणि चिखली येथे बी. एन. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही कंपनी असून तिचे कार्यालय विश्रांतवाडी येथे आहे. आरोपींनी ऑक्टोबर २०१३ मध्ये चेतन फोरम या जॉब पोर्टल डाटा संकेतस्थळावर बी. एन. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. चिखली या कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून नोकरीची जाहिरात दिली होती. त्यानुसार क्षीरसागर याच्यासह १०३ जणांनी संगणक अभियंता म्हणून या कंपनीत काम सुरू केले. नोकरीवर घेण्याच्या आगोदर कंपनीने प्रत्येकाकडून नोकरी सोडू नये म्हणून साधारण पन्नास हजार रुपये अनामत रक्कम घेतली होती. काम सुरू केल्यानंतर दोन महिने झाले तरी अभियंत्यांना कंपनीने त्यांचा पगार दिला नाही. त्यानंतर त्यांनी कंपनीकडे भरलेली अनामत रक्कम मागितली असता ती सुद्धा दिली नाही. क्षीरसागर यांच्यासह १०३ अभियंत्यांची ८४ लाख पाचशे रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिरी हे अधिक तपास करीत आहेत.