News Flash

पुणे, पिंपरीतील भाजपच्या कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी

पुणे आणि पिंपरी पालिकेत अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती आणि अजित पवार हेच दोन्हीकडचे कारभारी होते

पुणे, पिंपरीतील भाजपच्या कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समन्वयाचा अभाव, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यास सत्ताधारी असमर्थ ठरत असल्याने नाराजी

पिंपरी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता भाजपने राष्ट्रवादीकडून खेचून आणली. मात्र, सव्वा वर्षांनंतरही भाजपला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यासंदर्भात, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असमाधानी आहेत. पक्षसंघटना व पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसून विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचे खंडन होत नाही आणि त्यांना सक्षमपणे प्रत्युत्तर दिले जात नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

पुणे आणि पिंपरी पालिकेत अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती आणि अजित पवार हेच दोन्हीकडचे कारभारी होते. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आणि गैरकारभाराचे वाभाडे काढत भाजपने दोन्ही महापालिका आपल्याकडे खेचून आणल्या. निर्विवाद बहुमत मिळाल्याने दोन्ही महापालिकांमधील बहुकेत सर्व पदे (पुण्यात उपमहापौरपदाचा अपवाद) भाजप नगरसेवकांकडे आहेत. सत्तांतर होऊन सव्वा वर्ष झाले. या कालावधीत भाजपला आपल्या कामाचा ठसा उमटवता आलेला नाही. नागरिकांना अपेक्षित असलेला बदल दिसून येत नाही. भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकच पक्षाच्या कारभारावर नाराज आहेत. नागरिकांमध्येही कामे होत नसल्याचा सूर आहे. पिंपरी  पालिकेत सव्वा वर्षांतच ‘भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस बरी’, अशा पद्धतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व पाश्र्वभूमीवर, पिंपरीतील महापौरपदाच्या  निवडणुकीसंदर्भात, भाजपच्या ३० ते ३५ नगरसेवकांचा गट मुख्यमंत्र्यांना रविवारी मुंबईत भेटला. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी झालेल्या त्यांच्यातील चर्चेत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही महापालिकेच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर व्यक्त केला आणि आणखी सुधारणा करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात, लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. बैठकीस उपस्थित असलेल्या विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची  माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. कामात सुसूत्रता नसून एकसंधपणा दिसून येत नाही. संघटना आणि पालिकेतील कामकाज यांच्यात समन्वय नाही. पालिकेच्या कारभाराविषयी विरोधकांकडून राजकारण केले जाते. गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात, मात्र त्या आरोपांचे खंडन होत नाही आणि सक्षमपणे प्रत्युत्तरही दिले जात नाही. अभ्यासपूर्ण प्रतिवाद केल्यास विरोधकांची बोलती बंद झाल्याशिवाय राहणार नाही.

केवळ पुणे, पिंपरीच नव्हे, तर राज्यात जिथे-जिथे भाजपच्या हातात स्थानिक संस्थांचा कारभार आहे, तेथील कामगिरीत सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. सध्याच्या वातावरणामुळे वेळ उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगत,

थोडय़ाच कालावधीत पक्षाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणार असून कशाप्रकारची कामगिरी अपेक्षित आहे,

याविषयी मार्गदर्शन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीचे विषय

* कामात सुसूत्रता नाही, एकसंधपणा दिसून येत नाही.

*  संघटना आणि पालिकेतील कामकाजात समन्वय नाही.

*  आरोपांचे खंडन होत नाही.

*  आरोपांना सक्षमपणे प्रत्युत्तरही दिले जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2018 2:39 am

Web Title: chief minister devendra fadnavis disagree with the work of bjp in pune and pimpri
Next Stories
1 महापौरपदासाठी गुणवत्तेला प्राधान्य
2 बायोमेट्रिक यंत्रणेकडे महाविद्यालयांचे दुर्लक्षच
3 पोलिसांच्या पाठीशी नक्षलग्रस्त भागांचा अनुभव
Just Now!
X