मनमोहक हालचालींकडे पक्षिमित्रांचे लक्ष

तानाजी काळे, लोकसत्ता

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
actress neena kulkarni drama aaich ghar unhach
‘ती’च्या भोवती..! : आजही आईचं घर उन्हाचंच?

इंदापूर :  इंदापुरातील तहसील कार्यालयाच्या आवारात चिंचेच्या झाडावर वास्तव्यासाठी आलेल्या पाहुण्या चित्रबलाक पक्ष्यांची विणीच्या हंगामासाठी ‘सारंगार’ वसवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यांच्या मनमोहक हालचाली लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दरवर्षी युरोपीय देशातून आशिया खंडाकडे वळताना महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यातील त्यांची आश्रयस्थाने पक्षिमित्रांना आता परिचित झाली आहेत. तहसील कार्यालयाच्या आवारातील जुन्या शासकीय कार्यालयांच्या गजबजाटातील उंच चिंचेची झाडे हीच त्यांची पहिली पसंती असते. तालुक्यातील भादलवाडी परिसरात ब्रिटिशकालीन तलावातील झाडांवरही मागील बारा वर्षांपूर्वी चित्रबलाक पक्ष्यांनी मोठय़ा संख्येने वसाहत केली होती. मात्र वेळोवेळी पडलेल्या अवर्षणामुळे पाण्याची उपलब्धता कमी असल्याने भादलवाडी तलावाकडे त्यांनी पाठ फिरविली असली तरी या वर्षी इंदापुरातील चिंचेच्या झाडाचे ठिकाण त्यांचे माहेरघर झाले आहे.

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात थंडी वाढली की त्यांचे आगमन उजनी जलाशयाच्या पाणवठय़ानजीक होते. येथेच त्यांचा विणीचा हंगाम पार पडतो. मग सहा महिने या पक्ष्यांच्या गजबजाटाने उजनीचा परिसर खुलून जातो. त्यांच्या विणीच्या हंगामासाठी वसवलेल्या या वसाहतीला ‘सारंगार’ म्हणतात. सलग सहा महिने या सारंगाराला अनेक पक्षिमित्र, निसर्गमित्र भेट देत असतात. सध्या या पक्ष्यांची विणीच्या हंगामासाठी सारंगार वसवण्यासाठी जोरदार तयारी झाली असून, लवकरच त्यांची नवी पिढी येथे उदयाला येईल. त्यांची पिले उड्डाणक्षम करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या सुंदर कवायती पाहणे हा इंदापुरातील बाळगोपाळांचा नित्यक्रम होतो.

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पाऊस भारतात वेळेवर येणार असेल तर स्थलांतरित पक्ष्यांचे प्रयाण मे अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात हमखास होते. त्यामध्ये रोहित पक्ष्यांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ चित्रबलाक पक्षीही येथील उजनीचा पाहुणचार संपवून आपल्या पिलांसह प्रयाण करतात. उड्डाणक्षम नसलेल्या पिलांना उजनीच्या विस्तीर्ण पाणवठय़ावर सोडले जाते. येथे राहिलेले पक्षी उजनी जलाशयावर  एकाकी अवस्थेत आपल्या पुढच्या वर्षी येणाऱ्या सग्यासोयऱ्यांची वाट पाहतात. अशा वेळी उजनीकाठी असलेल्या अनेक जाती-प्रजातीच्या पक्ष्यांशी मिळतेजुळते घेत त्यांचे वास्तव्य पक्षिनिरीक्षकांसाठी कु तूहलाचे ठरते.