अंबिल ओढय़ाला आलेल्या पुरात नुकसान झालेल्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : आंबिल ओढय़ाला गेल्यावर्षी आलेल्या पुरात ओढय़ालगत असलेल्या सोसायटय़ांच्या सीमाभिंती वाहून गेल्यानंतर त्या बांधण्याचे महापालिके चे आश्वासन हवेतच विरले आहे. या सीमाभिंतींचे बांधकाम वर्षभरानंतर कागदावरच राहिल्याची वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते आणि महापालिकेने सीमाभिंती बांधून देण्याचे आश्वासन दिले खरे पण वर्षभर महापालिकेचे उंबरठे झिजविल्यानंतरही स्थानिक रहिवाशांच्या पदरी काहीच पडले नसल्याचे चित्र आहे.

आंबिल ओढय़ाला गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी पूर आला होता. या पुरात जीवित आणि वित्तहानी तर मोठय़ा प्रमाणावर झालीच पण अनेक सोसायटय़ांच्या सीमा तसेच संरक्षक भिंती वाहून गेल्या. आंबिल ओढय़ाच्या महापुराने वाताहात केल्यानंतर परिसराचे सर्वेक्षण करून २ हजार ८०० मीटर लांबीच्या सीमाभिंती, सुरक्षाभिंती बांधण्याचा १२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने केला. याशिवाय खासगी सोसायटय़ांमधील ५०७ मीटर लांबीच्या सीमाभिंती उभारण्याचेही महापालिकेने निश्चित केले. पुरानंतर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊ न सर्वच राजकीय पक्षांनी पाहणी दौरे केले आणि सीमाभिंती बांधण्याचे आश्वासन दिले. पण त्याला मूर्त रूप देता आले नाही.

खासगी सोसायटय़ांमधील बांधकामाचा खर्च राज्य शासनाकडून देण्यात येईल, असा निर्णय महापालिकेने घेतला. तसा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला. पण पुराच्या कटू आठवणी पुसट होताच पाठपुरावाही थांबला. खासगी सोयायटय़ांमध्ये महापालिकेचा निधी कायद्याने खर्च करता येणार नाही, अशी भूमिका महापालिका आणि सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यामुळे सीमाभिंती कागदावरच राहिल्या आहेत.

सीमाभिंती बांधून द्याव्यात यासाठी सोसायटीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिकांनी नगरसेवक, आमदारांकडे सातत्याने पाठपुरावा केला. महापालिकेचे उंबरठेही झिजवले पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. महापालिका प्रतिसाद देत नसल्यामुळे काही सोसायटय़ांनीच निधी जमवून सीमाभिंतीची कामे केली आहेत. पण लहान सोसायटय़ांना निधीची चणचण जाणवत आहे. यंदाही झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

समस्या काय

महापालिकेला नियमानुसार खासगी सोसायटय़ांमध्ये बांधकाम करता येत नाही. जिल्हा प्रशासनानेही महापालिकेचा प्रस्ताव फेटाळला आहे. निधीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. मात्र राज्यात झालेला सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.

सीमाभिंत बांधण्यासाठी सातत्याने महापालिके कडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासंदर्भात निवेदनही देण्यात आली. मात्र वर्षभरानंतरही सीमाभिंत बांधण्यात आलेली नाही. स्वखर्चाने काही कामे केली आहेत.   

—प्रवीण नानगुडे, रहिवासी गुरूराज सोसायटी

 महापालिकेला खासगी ठिकाणी खर्च करता येणार नाही. करोना संकटानंतर राज्य शासनाने ३३ टक्केच कामे करण्याचे आदेश दिले आहेत. खासगी सोसायटय़ांनी स्वखर्चातूनच कामे करणे अपेक्षित आहे. 

— प्रवीण गेडाम, मल:निस्सारण विभाग, अधीक्षक अभियंता

* महापालिकेने त्यांच्या मालकीच्या सीमाभिंती बांधण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. पण ही कामे अद्यापही अपूर्ण आहेत. निविदा प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादविवाद सुरू आहेत. आंबिल ओढय़ाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे कामही संथ गतीने आहे. आंबिल ओढय़ातील राडारोडाही तसाच पडला असल्याची वस्तुस्थिती आहे.