03 December 2020

News Flash

‘पिफ’मध्ये उलगडला दिग्गजांचा प्रवास!

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शत्रुघ्न सिन्हा, तनुजा, ना. धों. महानोर या ज्येष्ठ कलाकारांनी पत्रकारांशी गप्पा

| January 10, 2015 03:20 am

‘भरलं आभाळ पावसाळी पाहुणा’सारख्या लावण्या लिहून लावणीजगताचा नूर पालटून टाकणारे ‘रानातले कवी’ ना. धों. महानोर, अभिनेत्री होण्याची इच्छा नसतानाही कॅमेऱ्यासमोर उभे राहावे लागलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीतच रमलेल्या तनुजा आणि बिहारमधून पुण्यात येऊन अभिनयाचे शिक्षण घेताना खर्जातल्या आवाजापासून लोकप्रिय लकबींपर्यंतच्या गोष्टी प्रयत्नपूर्वक घडवणारे शत्रुघ्न सिन्हा या तिन्ही दिग्गजांनी आपला प्रवास उलगडला. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या ज्येष्ठ कलाकारांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.

कवीलाही साधना हवीच!9piff3
– ना. धों. महानोर

कविता लक्षात राहण्यामागे कवीची साधना असते, असे महानोर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हजार लोकवस्तीच्या खेडय़ात मी जन्मलो. घरात पाहिलेले दळणकांडण आणि त्याबरोबर ऐकलेल्या लोकसंगीताने माझी पायाभरणी केली. जे जगलो तेच मी लिहिले. अनेक कविता, अनेक कवी, गीतकार विसरले जातात. पण कवीला भाषेचा लहेजा आणि सांगीतिक भान यांचा घट्टपणा असेल, तरच तो लक्षात राहतो. ही साधना कवीसाठी महत्त्वाची असते. शांताराम आठवले, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके कायम लक्षात राहतात ते या घट्टपणामुळेच.’’
जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील लावण्यांनी लावणीजगतात आपला ठसा कसा उमटवला याबद्दलच्या आठवणीही महानोर यांनी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘मी एकदा बाहेर गेलो असताना काही लावणी नृत्यांगना मला भेटून माझ्या पाया पडल्या. अकलूजच्या लावणी महोत्सवात आपण ‘भरलं आभाळ’ ही लावणी कशी सादर केली आणि त्या लावणीने आपल्याला पारितोषिक मिळवून दिल्यामुळे आर्थिक चणचण कशी सुटली याची कथा त्या स्त्रीने सांगितली. लोक ज्या लावणीला नाक मुरडत होते, तिला ‘भरलं आभाळ’सारख्या लावण्यांनी चांगले दिवस आले.’’

‘संयुक्त राष्ट्रांसाठी दुभाषाचे काम करायचे होते!’9piff1
– तनुजा
इच्छा नसतानाही आपल्याला चित्रपटसृष्टीत कसे यावे लागले याची गोष्ट तनुजा यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘माझे कुटुंब चित्रपट क्षेत्रात नव्हते. माझ्या आईने तीसच्या दशकात चित्रपटात पाऊल ठेवले, तेव्हा या माध्यमाला कमी समजले जायचे. माझे वडील कुमारसेन समर्थ त्या वेळी जर्मनीला जाऊन चित्रपटनिर्मितीचे शिक्षण घेणारे पहिले होते. मी शिक्षण घ्यायला हवे असा आईचा आग्रह होता. चित्रपटांच्या वातावरणापासून दूर राहता यावे यासाठी मला स्वित्झरलँडला पाठवण्यात आले. पण नंतर कुटुंबावर आर्थिक तंगीची वेळ आली आणि आईने मला केवळ एका वर्षांसाठी देशात परत येण्यास सांगितले. परकीय भाषांचे शिक्षण घेत असल्यामुळे संयुक्त राष्ट्रांसाठी दुभाषाचे काम करण्याचे माझे ध्येय होते. पण चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आणि ते आवडू लागले. हिंदीसह बंगाली, गुजराती, मल्याळम, मराठीतही मला काम करता आले. लोकांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट त्यातून पूर्ण झाले.’’
‘दिलीप कुमार, मधुबाला, मीनाकुमारी, नूतन यांना अभिनय करताना पाहणे हा खूप छान अनुभव असायचा. अभिनयाची पद्धत (मेथड) शिकवली जाऊ शकते, पण अभिनय शिकवता येत नाही. चित्रपटाने पाहणाऱ्याचे मनोरंजन करण्याबरोबरच त्याला विचार करायला लावले, तरच तो चित्रपट पुन्हा बघितला जातो,’ असेही त्यांनी सांगितले.

‘माझा आवाजही प्रयत्नपूर्वक कमावलेला!’
– शत्रुघ्न सिन्हा

अभिनेता म्हणून माझ्यातल्या अनेक गोष्टी – माझा आवाजसुद्धा प्रयत्नपूर्वक घडवला आहे, असे शत्रुघ्न यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ ‘खिलौना’सारख्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये माझा आवाज वेगळा आहे. योग, प्राणायाम, दीर्घ श्वासोच्छ्वास अशा विविध उपायांच्या मदतीने मी माझा आवाज कमावला आहे. माझी पाश्र्वभूमी नाटकाची असेल असे अनेकांना वाटते. पण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये येण्यापूर्वी मी कधी रंगमंचावर कधीच गेलो नव्हतो. मूळची प्रतिभा असली, तरी तिला पैलू पाडणेही तितकेच महत्त्वाचे असते. किशोर कुमार, अशोक कुमार, दिलीप कुमार असे काही कलाकारच केवळ स्वत:च्या बळावर उभे राहिले. गुरू-शिष्य प्रथेप्रमाणे एफटीआयआयमध्येच मी सर्व शिकलो. ‘एकतर इतरांपेक्षा चांगले काम करा किंवा इतरांपेक्षा वेगळे काम करा, तरच तुम्ही लक्षात राहाल,’ हा मंत्र मला तिथे मिळाला आणि मी रियाझ करत राहिलो. राज कपूर यांच्याकडून मला सर्वाधिक प्रेरणा मिळाली.’’
सध्या ‘पी.के.’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबद्दल पत्रकारांनी सिन्हा यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी पी.के. पाहिलेला नाही, पण आमीर खान खूप चांगला अभिनेता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या चित्रपटात काही आक्षेपार्ह नसल्याचे सांगितले आहे. हे काही ‘बनाना रिपब्लिक’ नाही. न्यायालयाच्या मतांचा आपण आदर करायला हवा.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 3:20 am

Web Title: conversation with tanujashatrughna sinha and mahanor
Next Stories
1 सार्वजनिक आरोग्य सेवेतील प्रलंबित प्रश्न यंदा तरी सुटणार का?
2 शहरासाठी जुलैअखेपर्यंत ८.९५ टीएमसी पाणीसाठा मंजूर – कालवा समिती
3 ..तर स्वतंत्र मराठी विद्यापीठाची आवश्यकताच भासणार नाही – डॉ. न. म. जोशी
Just Now!
X