करोना विषाणूची आपत्ती आली असतानाच शहर आणि जिल्ह्यमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने महावितरणचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर आव्हानच निर्माण झाले होते. वादळी पावसामुळे शहर आणि जिल्ह्यत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, महावितरणच्या प्रकाशदूतांनी यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी अविश्रांत काम करीत वीजपुरवठा सुरळीत केला.

शहर आणि जिल्ह्यत बहुतांश ठिकाणी २५ मार्चला पहाटेपासून अगदी रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी दोन दिवस आधी दिवसाचे कमाल तापमान ३७ अंशांपर्यंत गेले होते. वाढलेल्या तापमानामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर पावसाचा मोठा परिणाम झाला. पुणे आणि िपपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पहाटेपासूनच कामाला सुरुवात केली. शहराच्या विविध भागांसह मुळशी, वेल्हे, बारामती, पुरंदर, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्यामध्येही          (पान २ वर)

करोना आणि वादळी पावसाच्या आपत्तीत सुरळीत विजेसाठी..

वादळी पावसाने थैमान घातले. वीजयंत्रणेवर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. त्यामुळे काही ठिकाणी वीजखांब जमीनदोस्त झाले. रस्त्यालगत असलेले जाहिरातींचे फलक फाटून ते वीजतारांमध्ये अडकून पडले.

जिल्ह्यत सुमारे ३५ ते ४० वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरी भागात रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी उतारावर असलेल्या फिडर पिलरमध्ये शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. करोनाच्या पाश्र्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असतानाच अवकाळी पावसाने महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र, तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. शक्य त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीज पूर्ववत करण्यात आली. करोनाच्या पाश्र्वभूमीवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही उपलब्ध मनुष्यबळात दुरुस्तीसह वीजतारांवरील फांद्या काढणे, अडकलेले पत्रे, बॅनर काढणे, वीजखांब उभारणी, वाहिन्या उभारणे आदी कामे अविश्रांत पूर्ण करण्यात आली.

सहकार्याचे आवाहन

पुढील दोन दिवसांत आणखी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठय़ासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यत्वे वादळ आणि अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने प्रथमत: पर्यायी वीजपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, हा पर्याय नसल्यास वीज यंत्रणेची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.