श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये म्हैसूर येथील श्री चामुंडेश्वरी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. दाक्षिणात्य शैलीतील हे मंदिर अनोख्या विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दगडूशेठ ट्रस्टतर्फे चामुंडेश्वरी मंदिर साकारण्यात येत आहे. हिराबागेजवळील महापालिकेच्या कोठी मैदानामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून सजावटीचे काम सुरू असून ४० सुतार काम करीत आहेत. उत्सवामध्ये पहिल्या दिवसापासून या मंदिराची रोषणाई गणेशभक्तांना पाहता येणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध शिल्पकार आणि या सजावटीचे कला दिग्दर्शक विवेक खटावकर यांनी दिली.
भारतामध्ये उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत. तर, दक्षिणेकडील राज्यामंधील मंदिरे द्राविड शैलीतील आहेत. मात्र, या दोन्ही शैलीचा संगम असलेल्या वेसर शैलीमध्ये म्हैसूर येथील चामुंडेश्वरी मंदिर घडविण्यात आले आहे. ११० फूट उंच, ५२ फूट रुंद आणि ३० फूट लांब असे या देखाव्याचे स्वरूप असेल. पाचमजली उंचीच्या चामुंडेश्वरी मंदिरावर दोन कीर्तिमुख असतील. मोल्डिंग पद्धतीने वेगवेगळ्या आकारातील कापण्यांच्या आधारे दाक्षिणात्य शैलीतील नक्षीदार मखर साकरण्यात येणार असून या मखरावर गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. पोर्टेबल प्लायवुडचा वापर करून हे मंदिर उभारण्यात येत आहे. हे मंदिर हुबेहूब साकारले जावे यासाठी रंगकाम करणारे २२ राजस्थानी कलाकार काम करीत आहेत. या मंदिरीसाठी १ लाख ६० हजार छोटय़ा आकारातील अंबर दिवे वापरण्यात येणार आहेत, असेही खटावकर यांनी सांगितले.