दररोज दोन ते अडीच हजार पाटय़ा पानांची आवक होणार

घटस्थापनेनिमित्त बुधवारी विडय़ाच्या पानांच्या मागणीत वाढ झाली. घरोघरी घटस्थापनेसाठी विडय़ांच्या पानाचा वापर केला जातो. पानांचे दर तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात सध्या दररोज दोन ते अडीच हजार पाटय़ा एवढी पाने विक्रीसाठी दाखल होत आहेत.

सांगली, सातारा, सोलापूर, कराड तसेच आंध्र प्रदेशमधून विडय़ांची पाने बाजारात विक्रीसाठी पाठविली जात आहेत. पानांचे कळी आणि फपडा असे दोन प्रकार असतात. कळीच्या पानांचा वापर पूजेसाठी केला जातो. फपडय़ांच्या पानांचा वापर पानपट्टीचालक करतात. पानशौकिनांकडून फपडय़ाच्या पानांना मागणी असते. सध्या कळीच्या पानांचा हंगाम सुरू झाला आहे. कळीच्या पानांची एक पाटीचा दर दोनशे ते एक हजार रुपये दरम्यान आहे. तर फपडा पानांच्या एका पाटीचा दर एक ते दोन हजार रुपये आहे. नवरात्रात कळीच्या पानांना मोठी मागणी असते, असे पान व्यापारी सुरेश गायकवाड यांनी सांगितले.

पान बाजारात सध्या दररोज दोन ते अडीच हजार पाटी पानांची आवक होत आहे. अन्य दिवशी ही आवक निम्म्यावर असते. एका पाटीत साधारणपणे दोन ते तीन हजार पाने बसतात. एका पुडक्यात सहा हजार तसेच एका डागात बारा हजार पाने असतात. महाराष्ट्रातील पानांची प्रत अन्य राज्यांतील पानांपेक्षा चांगली असते, असे गायकवाड यांनी नमूद केले.

अनुकूल हवामानामुळे उत्पादन चांगले

यंदा अनुकूल हवामानामुळे पानांचे उत्पादन चांगले आहे. बाजारात पानांना समाधानकारक दर मिळाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी तसेच संक्रांतीत पानांना मोठी मागणी असते. खते, मजुरीत वाढ झाली आहे. नैसर्गिक आपत्तीकडे लक्ष द्यावे लागते. पानमळा उभारणे कष्टाचे काम असल्याचे पान उत्पादक शेतकरी शांतिनाथ पाटील यांनी सांगितले.