शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ातील आरक्षणे उठवण्यास शिवसेनेचा विरोध असून  विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला. मोर्चानंतर शिवसेनेतर्फे या विषयावर परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते.
विकास आराखडय़ातील विविध शिफारशींना विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे जागर पुणे शहर विकास आराखडय़ाचा अशी मोहीम सुरू करण्यात आली असून पक्षातर्फे आराखडय़ाच्या विरोधात मंगळवारी महापालिका भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरसंघटक श्याम देशपांडे, सुनील टिंगरे, सचिन तावरे, महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ तसेच राधिका हरिश्चंद्रे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विकास आराखडय़ातील हरकती-सूचनांवरील सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियोजन समितीच्या विविध शिफारशींना यावेळी विरोध करण्यात आला.
शहरासाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा निकृष्ट आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ आणि नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि त्यांच्या सहभागातून विकास आराखडा तयार करावा, असे मत शिवसेनेतर्फे आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आले. शहरासाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा, त्यातील चुका आणि अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात नगर नियोजनाच्या अभ्यासक अनिता बेनिंजर, विनय खांडेकर, परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन यांनी सहभाग घेतला.