चार वष्रे कानाडोळा केलेल्या लोकप्रतिनिधींना आता जाग

गेली चार वर्षे प्रभागातील कामांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्यानंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर विकासकामे मार्गी लावू पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या ‘चमकोगिरी’मुळे हजारो नागरिकांना दररोज वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रातिनिधिक चित्र सांगवीत दिसून येत आहे. कित्येक दिवसांपासून सांगवीतील अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आले असून तेथे संथपणे काम सुरू असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मात्र, त्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

सांगवीला ‘मॉडेल वॉर्ड’ (आदर्श प्रभाग) करण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा अट्टाहास आहे. त्याअंतर्गत प्रभागातील रस्ते, विकासकामे मोठय़ा प्रमाणात करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांत प्रभागाकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. मात्र निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर एकेक करत कामे ‘काढण्यात’ आली आहेत. त्यासाठी जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसाळी दिवस असल्याने त्या ठिकाणी पाणी साचते, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सांगवीतून स्पायसर महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता तर कित्येक महिन्यांपासून खोदून ठेवलेला आहे. या ठिकाणी होत असलेले सिमेंट रस्त्याचे काम अतिशय संथपणे सुरू असल्याने या मार्गाने पुण्याकडे तसेच पुण्याहून िपपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. मात्र, त्याकडे अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. निवडणुक काळात केलेली कामेच लक्षात राहतात म्हणून याच काळात कामे सुरू करणे व ऐन निवडणुकांचा मोसम येईपर्यंत ती कामे लांबवत राहणे, असाच लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो, त्याचीच प्रचिती सांगवीकरांना आली आहे.

नगरसेवक म्हणतात, ‘करू’, ‘बघू’

अजित पवार यांच्या हस्ते पवारनगर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक फरशा बसवण्यात येणार असल्याचे सांगून  रस्ता खोदण्यात आला. प्रत्यक्षात, दोन महिन्यानंतरही ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. रस्ता अरूंद झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या भागातील व्यावसायिक, व्यापारी वैतागले आहेत. नगरसेवकांना अनेकदा सांगूनही करू, बघू अशी उत्तरे देण्याशिवाय त्यांनी काहीही केले नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.

पाणीपुरवठा, विद्युत तसेच खासगी कंपन्यांच्या विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. ती कामे लवकरच पूर्ण होतील. सिमेंट रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.  -शिरीष पोरेड्डी, अभियंता.