राज्य सेवा मुख्य परीक्षेचे अर्ज भरण्याची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज भरताना विविध अडचणी येत असल्याची तक्रार उमेदवारांकडून केली जात आहे. परीक्षेचा अर्ज भरून तो पाठवण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही अर्ज भरला जात नाही. त्याचप्रमाणे अर्जामध्ये अनुभव विचारण्यात आलेला आहे. मात्र, ज्या उमेदवारांना अनुभव नाही त्यांच्यासाठी ‘नाही’ हा पर्यायच अर्जात उपलब्ध नाही. त्यामुळेही काही अर्ज भरले जात नाहीत. संकेतस्थळ वारंवार क्रॅश होत असल्याची तक्रारही उमेदवार करत आहेत.
राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी ‘महाऑनलाईन’ या पोर्टलच्या माध्यमातून लोकसेवा आयोगाने अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली. मात्र, अजूनही या संकेतस्थळाबाबत अडचणी येत असल्याची तक्रार उमेदवारांकडून केली जात आहे.