देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने पिंपरी-चिंचवड शहरात दिवसरात्र फडकत राहणारा सर्वाधिक उंचीचा प्रेरणादायी राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्याची संकल्पना महापालिकेने मांडली. बराच काळ रडतखडत काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून तीन महिन्यांपूर्वी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर मात्र बहुतांश वेळा हा राष्ट्रध्वज काढून ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत होते. त्याचे कारण म्हणजे, तीन महिन्यांत पाच वेळा राष्ट्रध्वजाचे कापड फाटले होते.

शहरातील मोठय़ा प्रमाणात गर्दी जमणाऱ्या प्रमुख भागांपैकी निगडीचा भक्ती-शक्ती चौक आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या या चौकात छत्रपती शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित भव्य शिल्पसमूह आहे. या मध्यवर्ती ठिकाणी पालिकेने १०७ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंतचा सर्वात उंच म्हणजे १०५ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज बाघा सीमेजवळ आहे. याशिवाय, नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे (कात्रज) आदी ठिकाणी असे राष्ट्रध्वज आहेत. त्याच धर्तीवर, पिंपरीतही असा उंच राष्ट्रध्वज स्तंभ असावा, असा विचार पुढे आला होता. त्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहरवासीयांमध्ये या राष्ट्रध्वज स्तंभाविषयी फारच उत्सुकता होती. २६ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रध्वज स्तंभाची उभारणी झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी ध्वज पाहण्यासाठी होऊ लागली. मात्र, काही काळानंतर बहुतांश वेळा राष्ट्रध्वज काढून ठेवण्यात आल्याचे दिसून येत होते. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत होता.

राष्ट्रध्वजाचे कापड वारंवार फाटत होते आणि कापड फाटल्यानंतर ध्वज खाली उतरवण्यात येत होता. आतापर्यंत चार ते पाच वेळा ध्वजाचे कापड फाटले आहे. जोरदार वारा आल्यास धागे निघतात व त्यानंतर ध्वज फाटतो, असे पालिका अधिकारी सांगतात. राष्ट्रध्वज स्तंभाची उभारणी झाल्यानंतर दोन ते तीन आठवडय़ांतच कापड फाटले. त्याजागी लावलेला दुसरा ध्वजही आठच दिवसांत फाटला. दोन्ही ध्वज एकत्रितपणे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतरही ध्वज फाटण्याचे प्रकार सुरूच आहेत. आतापर्यंत दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. प्रारंभी पालिकेकडे पाच ध्वज होते. ते फाटल्याने आणखी तीन ध्वज मागवण्यात आले आहेत. सध्याचे ध्वज १२० बाय ८० फूट या आकाराचे आहेत. यापुढे ९० बाय ६० फुटांचे ध्वज ठेवण्याचा विचार पालिका स्तरावर सुरू आहे. पावसाळ्यातही चार महिने झेंडा काढून ठेवण्यात येणार आहे. मात्र, या विषयासंदर्भात अधिकृतपणे पालिका अधिकारी कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत.