मांसाहार आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना करोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. परिषदेने देशातील ४० ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांतील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या केलेल्या सिरो सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

भारतात करोना संसर्गाने धारण केलेले गंभीर स्वरूप पाहता कोणत्या लोकसंख्येत किती प्रमाणात करोनाचा संसर्ग होऊन गेला याचा अभ्यास केल्यास लसीकरणाचे धोरण ठरवण्यात त्याची काही मदत होऊ शकेल या उद्देशाने सीएसआयआरने हे सिरो सर्वेक्षण केले. देशभरातील ४० प्रयोगशाळांशी संलग्न कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा १०,४२७ प्रौढ व्यक्तींनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. सहभागी नागरिकांकडून त्यांची लोकसंख्यात्मक माहितीही संकलित करण्यात आली. त्यामध्ये रक्तगट, वैद्यकीय पार्श्वभूमी, व्यवसायाचे स्वरूप, आहाराच्या सवयी, व्यसने अशा माहितीचा समावेश होता. महामारी काळात दिसलेली करोनासदृश लक्षणे, संपर्कातील व्यक्ती आणि अवलंबलेले प्रतिबंधक उपाय याबाबतची माहितीही घेण्यात आली.

सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या १०,४२७ पैकी १०.१४ टक्के  म्हणजे १०५८ व्यक्तींमध्ये प्रतिपिंडे आढळल्यामुळे त्यांना करोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे निष्पन्न झाले. त्यांपैकी ३४६ जणांची तीन महिन्यांनंतर पुन्हा तपासणी केली असता त्यांच्यामध्ये सापडलेली प्रतिपिंडे कायम राहिल्याचे किंवा त्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. प्रतिपिंडांचे प्रमाण कायम राहिले तरी विषाणूंची पेशींवर हल्ला करण्याची क्षमता मात्र कायम राहिल्याचे दिसून आले. ३५ जणांच्या नमुन्यांची सहा महिन्यांनंतर तपासणी केली असता प्रतिपिंडे कमी झाली मात्र पेशींवर हल्ला करण्याची क्षमता तीन महिन्यांच्या तुलनेत सहा महिन्यांनीही कायम राहिल्याचे दिसून आले. सिरो सर्वेक्षणात संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट झालेल्या ७५ टक्के  व्यक्तींनी महामारीच्या काळात करोनासदृश कोणतेही लक्षण दिसल्याचेही स्मरणात नाही, अशी माहिती या सर्वेक्षणादरम्यान दिली आहे.