अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्याच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निर्णयाच्या विरोधात संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. ‘विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांवरच कारवाई का, कोणत्या निकषांच्या आधारे कारवाई करण्यात आली,’ असे प्रश्न संस्थाचालकांच्या संघटनेने उपस्थित केले आहेत.

त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांवर एआयसीटीईने कारवाई केली आहे. एआयसीटीईच्या या निर्णयाच्या विरोधात आता संस्थाचालकांच्या ‘असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट्स ऑफ अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस’ या संघटनेने न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाविद्यालयांकडून संस्थेने माहिती मागितली आहे.