पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्रावर वेळापत्रकही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते अधिक सोयीस्कर होणार आहे.

राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे ती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. आतापर्यंत प्रवेशपत्रांवर केवळ विद्यार्थ्यांचे छायाचित्र, परीक्षा केंद्राचा क्रमांक, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, बैठक क्रमांक, उत्तरलेखनाचे माध्यम आदी तपशील नमूद केला जात होता. मात्र, पहिल्यांदाच संपूर्ण परीक्षेचे वेळापत्रकही देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक स्वतंत्रपणे नोंदवून ठेवावे लागत होते. राज्य मंडळाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरच विषय आणि परीक्षेची तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करणे विद्यार्थ्यांना अधिक सोयीचे ठरणार आहे. बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.