एकशेदहा नगरसेवक, हजारो  नागरिकांकडून कामाबाबत समाधान

पुणे : घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्याचा घाट महापालिके ने घातल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आणि हजारो नागरिकांनी स्वच्छ करत असलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या कामाला पाठिंबा दर्शविला आहे. प्रस्तावित खासगी संस्थेऐवजी कचरावेचकांच्या ‘स्वच्छ’ संस्थेचे काम सुरू ठेवावे, असे पाठिंबा दर्शविणारे पत्र ११० सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिले आहे. तर शहरातील ६ लाख ६२ हजार ९७८ मिळकतींमधील ३३ लाख १४ हजार ९८० नागरिकांनीही स्वच्छ संस्थेच्या कामाबाबत समाधान व्यक्त के ले आहे.

सर्वपक्षीय ११० नगरसेवकांची पाठिंबा पत्रे आणि नागरिकांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करणाऱ्या स्वाक्षरी असलेला तब्बल २५ हजार पानांचा अहवाल कचरावेचक संचालक मंडळाने मंगळवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिला. सभागृहनेता गणेश बीडकर यांचीही शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा के ली. नगरसेवक, स्वच्छचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची बैठक घेतली जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून ‘स्वच्छ’च्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

कचरावेचकांची सहकारी संस्था असलेल्या ‘स्वच्छ’कडील कचरा व्यवस्थापनाचे काम काढून घेण्याचा आणि हे काम खासगी ठेके दाराला देण्याचा घाट महापालिके ने घातला होता. काही नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेच्या कामाबाबत सातत्याने तक्रारी के ल्यामुळे स्वच्छ आणि महापालिका यांच्यातील करार संपुष्टात आल्यानंतर खासगी ठेके दारांना काम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. स्वच्छच्या कचरासेवकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर स्वच्छला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. स्वच्छ संस्था राबवित असलेल्या कचरा व्यवस्थापनाचे प्रारूप मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असून या प्रस्तावित खासगीकरणाविरोधात स्वच्छ संस्थेने आक्रमक भूमिका घेतली होती.

स्वच्छ संस्थेच्या कामाबाबत नागरिक समाधानी आहेत का, याची चाचणी स्वच्छच्या सेवकांनी घरोघरी जाऊन के ली. शहरातील ६ लाख ६२ हजार ९७८ मिळकतींमधील ३३ लाख १४ हजार ८९० नागरिकांना त्याबाबत थेट विचारणा करण्यात आली. कामाबाबत समाधानी असलेल्या नागरिकांच्या स्वाक्षरीचा अहवाल एकत्रित करण्यात आला. याचबरोबर सर्वपक्षीय ११० नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेच्या कामाला पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले.

दरम्यान, दुसऱ्या संस्थेला काम देण्याची सत्ताधारी पक्षाची भूमिका नाही. पुढील काळात स्वच्छ संस्थेने कामाच्या पद्धतीने बदल करून त्रुटी दूर कराव्यात, असे सभागृहनेता गणेश बीडकर यांनी सांगितले. संस्थेच्या कामाबाबत काही भागातील नागरिकांच्या तसेच नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नगरसेवक, स्वच्छचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाईल आणि त्यातून योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही बीडकर यांनी स्पष्ट के ले.

खासगी संस्थेला काम देण्याचा घाट

स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्यात आले आहे. यापुढे कचरा संकलनासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून एका खासगी संस्थेला काम देण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सातत्याने प्रसिद्ध के ले होते. कचरा वेचकांची सहकारी संस्था असलेल्या स्वच्छ संस्थेचे कचरा व्यवस्थापनाचे प्रारूप मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी अनेकांनी के ला होता.