वृत्तपत्रे, दूध वितरण व्यवस्था कोलमडली; किराणा मालाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

शहरातील केवळ दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत (वॉर्ड) प्रशासनाकडून पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून सात वॉर्डमधील प्रत्येकी एका प्रभागात ही बंदी आहे. या बंदीमुळे शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ साडेदहा लाख नागरिक बाधित होत असताना पोलिसांकडून शहरातील मध्यभाग तसेच उपनगरातील रस्त्यांवर बांबूचे अडथळे टाकण्यात आले आहेत. परिणामी शहरातील अनेक भागांत दूध तसेच वृत्तपत्रे गुरुवारी पोहोचली नाहीत. सकाळी दूध उपलब्ध न झाल्याने अनेकांना त्याची झळ सोसावी लागली. वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे शहरात अघोषित नाकाबंदी करण्यात आल्याचे चित्र आहे. नाकाबंदी नसलेल्या मध्यभागातील पेठा, उपनगरांमधील किराणा माल दुकाने तसेच दूध डेअरी सकाळी फक्त दोन तास उघडी ठेवण्यात येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी शहराच्या ज्या भागात पूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे, तेथील संचार तसेच व्यवहारांवर बुधवारपासून कडक निर्बंध (कर्फ्यू) लागू करण्यात आले. पूर्व भागात निर्बंध घालण्यात आल्यानंतर संपूर्ण शहरात बाबूंचे अडथळे बांधण्यात आले. शहरातील मध्यभागातील गल्ली बोळात अडथळे उभारण्यात आले. त्यानंतर बुधवारी रात्री सिंहगड रस्ता, धायरी, कर्वेनगर, कोथरूड, बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज, आंबेगाव भागातील छोटे रस्ते आणि गल्ल्यांच्या तोंडावर अडथळे उभे करण्यात आले.

छोटय़ा रस्त्यांवर बांबूचे अडथळे बांधण्यात आले. त्यामुळे पहाटे दुधाच्या गाडय़ा मध्यभागातील अनेक भागात पोहोचल्या नाहीत. भाजी वाहतूक करणारे छोटे टेम्पो पोहोचले नाहीत. त्यामुळे गुरुवारी सकाळी अनेक भागात दूध तसेच भाजीपाला उपलब्ध झाला नाही. काही भागात वृत्तपत्रे देखील उपलब्ध होऊ शकली नाहीत. मात्र, ज्या भागात कडक निर्बंध नाहीत अशा भागातही बांबूने रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. निर्बंध घालण्यात आलेल्या भागात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत किराणा मालाची दुकाने खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना सकाळी दोन तास खरेदीची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या तिन्ही विभागांच्या प्रमुखांनी मिळून शहरातील करोनाबाधित रुग्ण वाढत असलेली ठिकाणे शोधून कार्यवाही करत आहोत. शहरात ज्या-ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढले आहेत, त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. शहरातील नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.

– तृप्ती कोलते, तहसीलदार, पुणे शहर

प्रमुख रस्त्यांना जोडणारे गल्लीबोळातील रस्ते बंद करण्याचा कोणताही निर्णय महापालिके ने घेतलेला नाही. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही भागातच के वळ टाळेबंदी करण्यात आली आहे. महापालिके ने टाळेबंदी जाहीर के ल्यानंतर पोलिसांकडून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्या अंतर्गत टाळेबंदी असलेल्या आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या हद्दीतील रस्ते पोलिसांनी बंद के ले आहेत. महापालिके कडून तशी त्यांना कोणतीही सूचना करण्यात आलेली नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत पोलिसांनी हा निर्णय घेतला असू शकतो.

– शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त