बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस अजूनही सुरू आहे. शुक्रवारी व शनिवारी मराठवाडय़ासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, रविवारी व सोमवारी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली. पावसाचे वातावरण अद्यापही कायम आहे. शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत राज्याच्या सर्वच भागात चांगल्या पावसाची नोंद झाली. आतापर्यंत पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाडय़ात सर्वदूर २० ते ८० मिलिमीटर इतका मोठा पाऊस पडला. त्यात उदगीर, चाकूर, उमरगा, तुळजापूर, निलंगा, लोहा, रेणापूर, अंबेजोगाई, लातूर, अदमहपूर, बीड, नांदेड, धारूर अशा सर्वच भागांचा समावेश होता. याशिवाय मध्य महाराष्ट्र व विदर्भातही पावसाने हजेरी लावली. हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अजूनही कायम असल्याने रविवारी व सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आला आहे. विशेषत: कोकणात काही ठिकाणी मोठय़ा वादळी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही मोजक्या ठिकाणी असा वादळी पाऊस अपेक्षित आहे, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले.