News Flash

पुणेकरांनो, हेल्मेट घाला, नाहीतर दंड भरा – पुणे पोलीस सक्रीय

पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे

दुचाकी चालवणाऱ्याकडे आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाकडे हेल्मेट असले पाहिजे आणि ते त्यांनी घातलेले पाहिजे

दुचाकीचालकांसाठी हेल्मेट सक्तीच्या नियमाचा कडाडून विरोध करणाऱ्या पुणेकरांना पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सामोरे जावे लागण्यास सुरुवात झाली आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून दुचाकीस्वारांकडून दंड वसुल करण्यास पुणे पोलिसांनी सुरुवात केली असून, काही चौकांमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना बाजूला घेऊन त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येत असल्याचे चित्र गुरुवारी दिसले.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारीच हेल्मेट सक्तीची संपूर्ण राज्यात लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पुणे पोलिसांनी वाहनचालकांना या नियमाची आठवण करून देत त्यांच्याकडून दंड वसुल करण्यास सुरुवात केली. शिवाजीनगर, डेक्कन-जिमखाना, टिळक रस्ता, कॅम्प या भागांमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड वसुल करण्यात येऊ लागला आहे. पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे, याकडे पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी एका कार्यक्रमात लक्ष वेधले. ते म्हणाले, दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलीस आधीपासूनच दंड वसुल करीत आहेत.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, सर्वत्र याची अंमलबजावणी होत नाही. काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येऊ लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी त्याला कडाडून विरोध केला होता. पुणेकरांनी सक्रीयपणे आंदोलनात सहभाग घेत हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला विरोध केला होता. आता पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होऊ लागल्यामुळे पुणेकर पुन्हा रस्त्यावर उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे शहरातील आठही आमदार भाजपचे आहेत. ते या प्रश्नावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच या आधी झालेल्या आंदोलनावेळी शिवसेनेनेही हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला विरोध केला होता. आता शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री असलेल्या दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असल्यामुळे शिवसेना पक्ष काय भूमिका घेतो आणि पुण्यातील शिवसेनेचे नेते त्याला कसा प्रतिसाद देतात हेसुद्धा पाहावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2016 3:40 pm

Web Title: helmet compulsory in pune
Next Stories
1 पुण्यात महापौर बदल; पण पिंपरीतील पेच कायम
2 अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे वाढल्यामुळे पुण्यात आणखी एक बालन्यायालय प्रस्तावित
3 शाळाबाहय़ मुलांच्या सर्वेक्षणात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न
Just Now!
X