सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आज पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील हॉटेल्स ग्राहकांसाठी सशर्त खुली करण्यात आली आहेत. परंतु, पहिल्याच दिवशी ग्राहकांचा हॉटेल्सना अल्प प्रतिसाद मिळाला. काही हॉटेल्स तर कामगारांविना बंद असल्याचं पाहायला मिळाले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनमध्ये देशभरातील हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती. गर्दीचं ठिकाण मानली जाणारी हॉटेलं अनलॉकच्या या पाचव्या टप्प्यात खुली करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाची परिस्थिती पाहता उद्योग व्यवसायांना सशर्थ परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे हॉटेल्स व्यवसायिकांनी देखील आक्रमक होत हॉटेल्स सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती.

दरम्यान, पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल्समध्ये ग्राहकांचा अल्प प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळालं. नेहमीपेक्षा केवळ ३० टक्केच व्यवसाय होत असल्याचं हॉटेल्स मॅनेजमेंटने सांगितलं आहे. करोनाच्या महामारीमुळं प्रत्येक हॉटेलचालक ग्राहकांची पुरेपूर काळजी घेत असून हळूहळू हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येईल असं सांगितलं जातं आहे.

तर, दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेलच्या जेवणापासून दूर असलेल्या ग्राहकांनी मात्र इथल्या जेवणावर येथेच्छ ताव मारला. हॉटेल चालक आणि मालकांनी ग्राहकांची काळजी घ्यावी अस मत काही ग्राहकांनी व्यक्त केलं आहे.