इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने(आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या इंटरमिजिएट परीक्षेचा (जुना आणि नवा अभ्यासक्रम) निकाल ऑनलाइन जाहीर केला. जुन्या अभ्यासक्रमात मुंबईचा श्रीपाल दोशी आणि कोलकाता येथील अभिनव मिश्रा यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला, तर नव्या अभ्यासक्रमात जयपूरचा अक्षत गोयल पहिला आला.

सनदी लेखापाल अभ्यासक्रमाची इंटरमिजिएट (आयपीसीसी) परीक्षा मेमध्ये घेण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमानुसार गट एकचा निकाल १४.६५ टक्के, गट दोनचा निकाल २१.८० टक्के लागला. दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्यांचा मिळून निकाल १.९० टक्के लागला. जुन्या अभ्यासक्रमात श्रीपाल दोशी आणि अभिनव मिश्रा यांनी प्रथम, ओडिसाच्या ज्योती अगरवालने द्वितीय, चेन्नईच्या दर्शन एस. दिल्लीच्या जी. राघवेंद्र प्रसाद यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

आयपीसीसीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या गट एकचा निकाल १७.६९ टक्के, गट दोनचा निकाल ३१.७० टक्के लागला. दोन्ही गट मिळून निकाल १७.११ टक्के लागला. या अभ्यासक्रमात अक्षत गोयलने प्रथम, मुंबईची मीत शहा हिने द्वितीय आणि पानिपतच्या अंजली गोयलने तृतीय क्रमांक मिळवला.

पुण्याचा उत्कर्ष सिंघानिया देशात पाचवा

पुण्याच्या उत्कर्ष सिंघानियाने देशात पाचवा क्रमांक प्राप्त केला. उत्कर्षचे वडील मनीष हेही सनदी लेखापाल आहेत. ‘सातत्यपूर्ण पद्धतीने अभ्यास करत होतो. प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा सराव करत होतो, उजळणीवर भर देत होतो. स्वयंअध्ययनावर भर दिला होता. परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमातील बदल लक्षात घेतले. जिद्द आणि महत्त्वाकांक्षा ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते,’ अशी भावना उत्कर्षने व्यक्त केली.