राज्यसेवेत पहिल्या आलेल्या स्वाती दाभाडेची प्रेरणादायी कथा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आमच्या घरात कोणीही पदवीपर्यंतही शिकलेले नाही.. परिस्थिती नसल्याने बहिणीचे शिक्षण बारावीनंतर थांबवण्यात आले. तसेच माझेही थांबवण्यात आले. मात्र, चार वर्षे शिकवण्या करून पैसे साठवत होते. त्या वेळी मला वाटले की आपण मागे पडतोय.. म्हणून घरच्यांचा विरोध पत्करून राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. गेल्या वर्षी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली तेव्हा आणि आता उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यावर वडिलांना वाटते, की मुलीची चार वर्षे वाया घालवायला नको होती..’

राज्यसेवा मुख्य परीक्षेत महिलांमध्ये पहिल्या आलेल्या पुणे जिल्ह्य़ातील तळेगावच्या स्वाती दाभाडेची ही प्रेरणादायी कथा! राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर युनिक अ‍ॅकॅडमीतील  निवड झालेल्या उमेदवारांनी एकत्र येऊन शुक्रवारी आनंद साजरा केला. त्या वेळी स्वातीने तिचा आजवरचा प्रवास सांगितला.

स्वातीचे आई-वडील शेती करतात. तीन भावंडांमध्ये स्वाती सर्वात लहान. आर्थिक परिस्थिती नसल्याने भाऊ आणि बहिणीचे शिक्षण बारावीनंतर थांबले. विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी बारावी झाल्यावर स्वातीचेही शिक्षण थांबण्यात आले. मात्र, स्वातीने शिकवण्या सुरू केल्या. शिकवण्या करताना तिला वाटले, की आपल्याबरोबरची अन्य मुले पुढे जात आहेत. त्यामुळे आपणही शिकले पाहिजे असा विचार करून तिने चार वर्षांच्या खंडानंतर तळेगावातील इंद्रायणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. महाविद्यालयात असताना सध्याचे वस्तू आणि सेवा कर विभागाचे आयुक्त सुनील काशीद यांचे व्याख्यान ऐकून तिला राज्यसेवेविषयी आकर्षण निर्माण झाले. तिच्या वडिलांच्या मित्राने समजावल्यावर वडिलांनी राज्यसेवेची तयारी करण्यासाठी परवानगी दिली, मात्र त्यासाठी पुण्यात राहायचे नाही हा त्यांचा आग्रह होता. तो मान्य करून स्वातीने २०१५ मध्ये पुणे-तळेगाव रोज येऊन-जाऊन शिकवणी केली. त्यानंतर २०१५ मध्ये राज्यसेवेच्या पाच परीक्षांमध्ये तिची निवड झाली. त्यात लिपिक, सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, नायब तहसीलदार पदांसाठी निवड झाली. या दरम्यान तिने वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीही मिळवली. आता उपजिल्हाधिकारी पदासाठी तिची निवड झाली आहे.

शासकीय योजनांचे लाभ ग्रामीण भागात प्रभावी रीत्या पोहोचत नाहीत. त्यामुळे अधिकारी म्हणून काम करताना समाजातील प्रत्येकाशी जोडले जाऊन काम करण्याला प्राधान्य देणार आहे. आपण लोकांना लाभ देण्यापेक्षा लोकांनी हक्काने ते आपल्याकडून घेतले पाहिजेत. मीही ग्रामीण भागातील असल्याने समस्यांची जाणीव आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुली-महिलांसाठी काम करण्यावर माझा भर असेल.

– स्वाती दाभाडे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspiring story of swati dabhade who came first in the state service exam
First published on: 16-02-2019 at 00:43 IST