पिंपरी-चिंचवडकर हैराण; पवना धरण पूर्णपणे भरल्यानंतरही शहरभरात तक्रारी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्णपणे भरले आहे. धरणक्षेत्रासह शहरात दररोज मुसळधार पाऊस पडतोच आहे. मुबलक पाण्याचा साठा असतानाही शहरभरात पाण्याविषयी ओरड होत असून अपुरा, अनियमित आणि दूषित पाणीपुरवठय़ाने शहरवासीय हैराण झाले आहेत. महापालिकेचा नियोजनशून्य कारभार आणि पाणीपुरवठा विभागाच्या कुचकामी यंत्रणेचे हे फलित असल्याचे मानले जाते.

पिंपरी पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा कारभार  रामभरोसे असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरवासियांना गरजेइतके पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी जुन्याच आहेत. मधला काही काळ वगळता पाण्याविषयीच्या तक्रारी नव्याने होऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरभरात ठिकठिकाणी पाण्याविषयी ओरड आहे. काही ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा, काही ठिकाणी पाणी येण्याची कोणतीही वेळ नाही. तर, काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. या सर्व तक्रारींमुळे शहरवासीय हैराण आहेत.

गेल्या वर्षी अशीच परिस्थिती होती, तेव्हा पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह रामदास तांबे, प्रवीण लडकत आदींनी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा ‘प्रयोग’ केला. त्यामुळे वर्षभरापासून शहरवासियांना दिवसाआड पाणी दिले जात आहे. यामुळे पाणीविषयक तक्रारी कमी झाल्या. उन्हाळ्यातही तक्रारी झाल्या नाहीत, नेहमी होणारी आंदोलनेही झाली नाहीत, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येतो. अशातच शहरातील पाणीप्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्याचा पाणीप्रश्न गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, पालिकेची कुचकामी यंत्रणाच या टंचाईला जबाबदार असल्याचे मानले जाते. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रामदास तांबे यांच्याकडे प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालिकेची बाजू समजू शकली नाही.

आज पदाधिकारी, गटनेत्यांची बैठक

उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी पाणीपुरवठय़ावरून सातत्याने तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेऊन महापौर माई ढोरे यांनी, मंगळवारी (२२ सप्टेंबर) दुपारी चार वाजता पालिका मुख्यालयात विशेष बैठक आयोजित केली आहे. पालिका पदाधिकारी, गटनेते आणि पाणीपुरवठय़ाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाण्याविषयीच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.