महापालिका प्रशासनाने साफ धुडकावून लावलेला लाईट रेल्वेचा प्रकल्प स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला. महापालिका पदाधिकाऱ्यांच्या जपान दौऱ्याचेच हे फलित असल्याची चर्चा असून जपानच्या दौऱ्यात नक्की काय घडले ते या निर्णयामुळे मंगळवारी उघड झाले. जपानची एक कंपनी पुण्यात लाईट रेल्वेचा प्रकल्प करायला उत्सुक असून याच कंपनीबरोबर महापालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठका व चर्चा जपानमध्ये गेल्या महिन्यात झाल्या होत्या.
शिवाजीनगर ते हिंजवडी या दरम्यान २१ किलोमीटर लांबीचा लाईट ट्राम रेल्वे हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मेट्रोच्या तुलनेत शहरात लाईट रेल्वेचा प्रकल्प राबवणे योग्य व व्यवहार्य ठरणार नाही, या प्रकल्पाची उपयुक्तता तपासली जावी, असा स्पष्ट अभिप्राय महापालिका प्रशासनाने दिला होता. तरीही हा प्रकल्प शहरात आणण्यासाठी महापालिकेत हालचाली सुरू होत्या. महापालिकेचे पदाधिकारी जपानच्या दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर लाईट रेल्वे प्रकल्पाला मंगळवारी देण्यात आलेली मंजुरी चर्चेची ठरली असून या प्रकल्पाची शहराला गरजच काय, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान लाईट रेल्वे प्रकल्प राबवण्यासाठी जपानची तोशिबा कंपनी प्रयत्नशील आहे. जपान दौऱ्यातही या कंपनीने लाईट रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण पदाधिकाऱ्यांसमोर केले होते. या प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण व त्याचा अहवालही कंपनीने स्वत:हून तयार केला आहे. जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी (जेईसीए- जायका) या कंपनीने त्यासाठी अर्थपुरवठा केला होता. सर्वेक्षणाचा हा अहवाल फेब्रुवारी महिन्यात महापालिकेला सादर झाला. मात्र, या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर हा प्रकल्प पुणे शहरासाठी व्यवहार्य ठरणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. मेट्रोच्या तुलनेत हा प्रकल्प खर्चिक आहे आणि अन्यही कारणांमुळे तो पुण्यात राबवणे योग्य ठरणार नाही, असे महापालिका प्रशासनाचे मत आहे.
या प्रतिकूल अहवालानंतर पदाधिकारी जपान दौऱ्यावर जाऊन आले आणि आता प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो मार्गाला बाधा न आणता एमआयडीसीने हा प्रकल्प करावा, या अटीवर या प्रकल्पाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. या प्रकल्पाचा फक्त साडेसहा किलोमीटर लांबीचा मार्ग महापालिका हद्दीतील (शिवाजीनगर ते औंध) आहे. या प्रकल्पातील शिवाजीनगर ते ई स्क्वेअर हा मार्ग उन्नत (एलेव्हेटेड) आणि विद्यापीठ ते औंध हा टप्पा रस्ता पातळीवर दर्शवण्यात आला आहे. दोन टप्प्यातील या प्रकल्पात २३ स्टेशनचे नियोजन आहे.
लाईट रेल्वे; काय काय घडले..?
– जपानच्या कंपनीकडून पुण्यात स्वखर्चाने सर्वेक्षण
– कंपनीकडून लाईट रेल्वे प्रकल्पाचा अहवाल सादर
– प्रकल्प अव्यवहार्य असल्याने पालिका प्रशासनाने तो फेटाळला
– महापालिकेचे पदाधिकारी जपानच्या दौऱ्यावर
– दौऱ्याहून परतल्यानंतर लाईट रेल्वे प्रकल्पाला मंजुरी