पुढील पिढीच्या सर्वांगीण विकासात डिजिटल माध्यमातून दिलेल्या समग्र शिक्षणाचा महत्वाचा वाटा असणार आहे. दृक-श्राव्य पद्धतीने शिक्षणाचा अनुभव अधिक आनंददायी होतो. अलीकडेच जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने (जेबीजीव्हीएस) आपल्या नाविन्यपूर्ण इ-लर्निंग प्रकल्पांतर्गत वर्ध्यातील सर्व ७३७ पात्र जिल्हा परिषद शाळांत इ-लर्निंग संच बसवले. शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला सुद्धा यातून एक प्रकारे हातभार लागतो. कारण संगणक व त्याच्याशी निगडीत माध्यमे वापरण्यात पारंगत असलेले विद्यार्थी मोठे झाल्यावर डिजिटल व्यवहार करायला अधिक सक्षम असतील.
मागील तीन वर्षांत वर्ध्यातील हिंगणघाट, देवळी, आर्वी, सेलू, समुद्रपूर, करंजा, आष्टी व वर्धा अशा सर्व तालुक्यात सदर प्रकल्प पोहोचला आहे. याबद्दल माहिती देताना जेबीजीव्हीएसचे प्रकल्प समन्वयक विनेश काकडे म्हणतात, “जिल्ह्यातील ४९,२३१ विद्यार्थ्यांना इ-लर्निंग संचांचा आत्तापर्यंत लाभ झाला आहे.” ज्या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या २० पेक्षा जास्त आहे त्यांना प्रकल्पासाठी पात्र ठरवण्यात आले. सामान्यपणे संगणक वापरण्याची संधी न मिळणाऱ्या शेतकरी, खाण कामगार व मजुरांच्या मुलांनाही या प्रकल्पातून अशी संधी मिळाली. जेबीजीव्हीएस कर्मचारी व एका बाह्य सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार शाळेतील वाढलेली नाव नोंदणी; परीक्षेतील सुधारित कामगिरी; कमी झालेली गैरहजेरी आणि दृक-श्राव्य पद्धत, प्रश्नोत्तरे व डिजिटल खेळांच्या माध्यमातून सुधारलेले विषयांचे आकलन असे फायदे दिसून आले.

या यशावर भाष्य करताना जेबीजीव्हीएसचे संचालक कर्नल विनोद देशमुख म्हणाले, “शालेय शिक्षण आकर्षक व रंजक करणे आणि मुलांना संगणक हाताळण्याची सवय करून देणे असे दुहेरी उद्देश्य इ-लर्निंग संचांतून साध्य होतात. संगणकाचे ज्ञान आत्मसात करण्याची फारशी संधी मिळत नसलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून समग्र शिक्षण पुरवण्यात या उपक्रमाचा मोठा वाटा आहे.”
जेबीजीव्हीएस इ-लर्निंग प्रकल्पाविषयी
डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शासकीय व अल्प खर्चात चालणाऱ्या खासगी शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे आणि आनंददायी शालेय वातावरण निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. सुरवातीला दोन वर्षांत (२०१४-१५ व २०१५-१६) १,००० संच पुरवणे हे ध्येय ठरवण्यात आले. पण पुढे २०१६-१७ मध्ये राज्याच्या विविध भागांत १,५५८ संच वितरीत करून हे ध्येय केव्हाच पार करण्यात आले. यातील जवळजवळ अर्धे संच एकट्या वर्धा जिल्ह्यात बसवण्यात आले. मार्च २०१७ अखेरी पर्यंत पुणे, औरंगाबाद व वर्धा जिल्ह्यांत मिळून १,६७,१७० विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळच्या पहिली ते दहावी पर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा (एसएससी) यामध्ये समावेश आहे. प्रत्येक संचात इ-लर्निंग प्रणाली साठवलेला एक संगणक (लॅपटॉप), एक दूरदर्शन संच/प्रक्षेपक आणि मूल्य शिक्षण व वैयक्तिक आरोग्य यांवरील दोन माहिती संच यांचा समावेश आहे. जेबीजीव्हीएसच्या शैक्षणिक कर्मचाऱ्यांतर्फे वेळोवेळी सर्व ठिकाणच्या शाळांना अचानक भेटी देऊन बसवलेल्या इ-लर्निंग संचांची पाहणी केली जाते.
विविध समाज घटकांचा सहभाग
या प्रकल्पाच्या यशात विविध समाज घटकांचा मोलाचा सहभाग आहे. सर्व प्रथम जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा उल्लेख करायला हवा ज्यांनी आपल्या कामातून वेळ काढून इ-लर्निंग पद्धत समजून घेतली व नंतर विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीजास्त फायदा कसा होईल हे बघितले. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी इ-लर्निंग प्रकल्पाची माहिती लाभार्थी शाळांना दिली. शाळांनी सुद्धा संचाच्या एकूण किमती पैकी १०% रक्कम उभी करून हातभार लावला. लाभार्थींमध्ये विद्यार्थी व शिक्षकांव्यतिरिक्त गावकऱ्यांचाही समावेश आहे कारण माहितीपट व पंतप्रधानांची भाषणे अशा उपयुक्त गोष्टी त्यांच्या पर्यंत इ-लर्निंग संचांमार्फेत पोहोचतात.