होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारी आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धा या वर्षी पुण्यात होणार असून ३ ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये या स्पेर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या वतीने दरवर्षी १५ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धा घेण्यात येते. दरवर्षी जगातील एका देशामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी ही स्पर्धा ३ ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये पुण्यातील बालेवाडी क्रीडानगरी येथे ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी ४५ देशांमधील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतामध्ये या स्पर्धेसाठी तीन टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थेतर्फे पहिल्या फेरीसाठी साधारण तीनशे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनतर्फे दुसरी फेरी घेतली जाते. त्यातून ३५ विद्यार्थ्यांची तिसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात येते. निवडण्यात आलेल्या ३५ विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊन त्यातून ६ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येते.
या स्पर्धेसाठी ३ डिसेंबरला विविध देशातील विद्यार्थी पुण्यात येणार आहेत. ४ डिसेंबरला स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेतील पहिली फेरी ५ डिसेंबरला आणि दुसरी व तिसरी फेरी ७ आणि ९ डिसेंबरला होणार आहे. १२ डिसेंबरला स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस समारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी आलेले विद्यार्थी खोडद येथील दुर्बीण, जाधवगड, राजा केळकर वस्तुसंग्रहालय, सिंहगड या ठिकाणी भेट देणार आहेत.