किट खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया

आधार दुरुस्तीसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट वापरले जाणार असल्यामुळे (यूसीएल) आधार दुरुस्ती अवघ्या पाच मिनिटांत होणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाने केला होता. त्यानंतर दुरुस्तीसाठी केंद्रांवर हेलपाटे घालणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असे वाटत असतानाच हे किट उपलब्ध होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. किट कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेली संगणकीय प्रणाली प्रशासनाकडे उपलब्ध नाही. तर दुसरीकडे किट खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि नागरिक दुहेरी कोंडीत अडकले आहेत.

यूसीएल किटद्वारे केवळ आधार दुरुस्ती करण्याकरिता जिल्हा प्रशासनाला चालू महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार एका आठवडय़ात हे किट प्राप्त होऊन महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांत ही यंत्रणा सुरू होणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून यूसीएल किटकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. डिसेंबरअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) यूसीएल किट चालविण्याची संगणकीय प्रणाली देखील जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही.

गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. एका आधार यंत्रावर एका व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्तीचे काम करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे नीट न आल्यास हाच कालावधी तीस मिनिटांपर्यंत वाढतो. त्यानुसार सकाळी दहा ते सहा या वेळेत केवळ वीस ते पंचवीस आधारची कामे होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ आधार दुरुस्तीकरिता यूआयडीएआयकडे यूसीएल किटची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. परंतु, शासकीय नियमांनुसार निविदा प्रक्रिया राबवून यूसीएल किट खरेदी केले जाणार आहे. तसेच किट चालविण्यासाठीची संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) देखील यूआयडीएआयकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आधार दुरुस्तीसाठी पुणेकरांना अद्यापही प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपडेट क्लायंट लाइफ (यूसीएल किट) हे एक बायोमॅट्रिक डिवाइस असून त्याला लॅपटॉप आणि प्रिंटर जोडावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास यूसीएल किट प्राप्त होऊन महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाच किट बसविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. आधारची कामे आता ऑनबोर्ड होत असल्याने संबंधित कागदपत्राची फाइल संलग्न करून लोड करावी लागते. त्यामुळे दुरूस्तीसाठी छायाचित्र ओळखपत्र व पत्ता पुरावा आवश्यक आहे, अशी माहिती आधारचे समन्वय अधिकारी विकास भालेराव यांनी दिली.

आम्ही केवळ संगणकीय प्रणाली देऊ. यूसीएल किट तुम्हाला खरेदी करावे लागेल, असे यूआयडीएआयकडून जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २२ डिसेंबरनंतर दोन ते तीन दिवसांत किट उपलब्ध होतील. तसेच यूआयडीएआयकडून दोन दिवसांत यूसीएल किट चालविण्याची संगणकीय प्रणाली प्राप्त होईल.

– विकास भालेराव, आधार समन्वय अधिकारी आणि तहसीलदार