‘‘भाषा या आपल्यावरचे ओझे नाहीत, तर ती आर्थिक संपत्ती आहे. भाषांवर आधारित तंत्रज्ञानाचा विकास लक्षात घेता, येत्या काळात अधिक भाषा असणाऱ्या देशाला सुबत्ता मिळणार आहे,’’ असे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी सांगितले.
‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या खंडाच्या प्रकाशन समारंभामध्ये डॉ. देवी बोलत होते. भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षणाच्या एकूण पन्नास खंडांपैकी ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या खंडाचे प्रकाशन पद्मगंधा प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर, ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या खंडाचे संपादक अरूण जाखडे उपस्थित होते.
या वेळी डॉ. देवी म्हणाले,‘‘सर्व नवीन तंत्रज्ञान हे भाषांवर आधारित आहे. त्यामुळे ज्या देशामध्ये सर्वाधिक भाषा आहेत, त्या देशाला सुबत्ता मिळणार आहे. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. जगात सहा हजार भाषा आहेत आणि त्यातील ८५० भाषा आपल्याकडे आहेत. आपल्याच विकासासाठी या भाषांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आपल्याकडून सीमेवरील भाषांकडे दुर्लक्ष केले जाते. भाषा ही माणूसपणाची खूण आहे, ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. भाषेचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी नाही कारण भाषा शासन तयार करत नाही, ती समाजातून तयार होते, त्यामुळे भाषांच्या संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे.’’
या वेळी केतकर म्हणाले, ‘‘प्रत्येक देश आपापल्या अस्मिता जपत असताना, आपल्याला आपल्या विविधतेचा अभिमान वाटायला हवा. भाषा हे संस्कृतीचे मूळ आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’ पाडगावकर म्हणाले,‘‘भाषेला राजकारणाशी जोडल्यामुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे. आपली ओळख ही भाषेशी जोडली गेली आहे, त्यामुळे असहिष्णुता वाढली आहे. पर्यायी विविधता नको, समानता हवी अशी भावना तयार होत आहे. मात्र, ती धोकादायक आहे.’’