27 February 2021

News Flash

प्रेरणा : बोल कायद्याचे

विविध व्याख्यानांच्या माध्यमातून त्या कायदेविषयक जनजागृती करतातच

आपली नोकरी वा उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक जण काही ना काही सामाजिक काम अगदी मनापासून करत असतात. त्यांच्या या कार्याची माहिती वाचून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल

कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये, हे वाक्य गुळगुळीत झालेले असले तरी ते लोकांच्या मनावर कोरले गेले आहे. त्यामुळे कायदेशीर बाबी जाणून घेण्याबाबत अनास्थेबरोबरच अन्याय झालेला असतानाही वकिलाचा सल्ला घेण्याचे किंवा पोलिस ठाण्याची पायरीदेखील चढण्याचे अनेक जण टाळतात. कायदा या विषयावर जनजागृती केली, तर अनेक प्रसंगांमध्ये कोर्टाची पायरी न चढतादेखील प्रश्न सोडविता येऊ शकतात. यासंबंधात मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे अ‍ॅडव्होकेट निलीमा किरणचंद्र म्हैसूर. वकिलीबरोबरच सामाजिक भान जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. विविध व्याख्यानांच्या माध्यमातून त्या कायदेविषयक जनजागृती करतातच, शिवाय त्यांनी ‘बिलोरी’ या गटाचीही १९९९ मध्ये स्थापना केली आहे. या गटाच्या माध्यमातून कायदेविषयक माहितीबरोबरच इतरही विविध कंगोऱ्यांमधून सामाजिक बांधीलकीचे काम केले जाते. मानसशास्त्रीय मार्गदर्शन, विवाह समुपदेशन आदींच्या माध्यमातून समस्येचे निराकारण होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन संपूर्णपणे विनामूल्य असते.

अनेकदा घटस्फोटासारखा विषय घेऊन येणाऱ्या विवाहितांना याशिवाय उपलब्ध असलेले पर्याय उपलब्ध करुन देत मानसिक सक्षमीकरण करण्यात येते. याविषयी कायदेशीर तरतुदी सांगितल्या जातात. दुसऱ्या कोणाला दूषण देण्यापेक्षा विवेकनिष्ठ  विचाराद्वारे (रॅशनल थिकिंग) निर्णय घेण्यास प्रवृत्त केले जाते.

कायदेविषयक माहिती सोप्या पद्धतीने पोहोचवत असताना, येणाऱ्या विविध अडचणींवर आधारित नाटय़प्रसंगांची निर्मिती केली जाते आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक तसेच व्यावसायिक संस्थांमधून मार्गदर्शन करण्याचे कार्यही निलीमा म्हैसूर करतात. LEAF ( Legal Empowerment Assistance Forum) तर्फे प्रत्येक व्यक्तीस कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, यासाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.

त्यासाठी नाटय़प्रवेश, खेळांच्या माध्यमातून सहज समजणाऱ्या भाषेत कायद्याचे ज्ञान दिले जाते. यामध्ये मूल जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत काही विभाग करण्यात आले आहेत. त्यानुसार कायद्याचे वर्गीकरण करुन माहिती दिली जाते. याचा अनेकांना फायदा होतो. जन्मदाखला, शाळेचा दाखला, महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, योग्य महाविद्यालयांची निवड कशा पद्धतीने करायची, विवाहविषयक कायदे, व्यवसाय, नोकरीसाठीचे कायदे, विमाविषयक कायदे,

ज्येष्ठ नागरिकांचे कायदे, मृत्यूपत्र व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संपत्तीचे हस्तांतरण करीत असताना घ्यावयाची दक्षता अशी माहिती दिली जाते. तसेच मृत्यूचा दाखला व त्याचे महत्त्वदेखील विशद केले जाते. त्यांच्याकडून कायदेविषयक माहिती हवी असल्यास neelimamysore@gmail.com या ईमेलद्वारे संपर्क साधता येईल.

shriram.oak@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 4:27 am

Web Title: law issue neelima mysore
Next Stories
1 जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांची भाषणे पाहून कायद्यानुसार कारवाई होणार : सेनगावकर
2 पिंपरी-चिंचवड: मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
3 उमर खालिद, जिग्नेश मेवाणीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
Just Now!
X